- जैन मुनी निलेश चंद्र यांनी भिवंडीत एका सभेत महात्मा गांधींच्या हत्येचे खुले समर्थन केले आहे
- त्यांनी नथुराम गोडसेच्या कृत्याचे समर्थन केले आहे
- निलेश चंद्र यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊन अनेक स्तरातून तीव्र संताप व्यक्त होतोय
जैन मुनी निलेश चंद्र आणि वाद असं समिकरणच निर्माण झालं आहे. त्यांनी आता नवा वाद ओढवून घेतला आहे. त्यांनी महात्मा गांधी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ठाणे जिल्ह्यातील भिवंडीमध्ये जैन मुनी निलेश चंद्र यांनी पुन्हा एकदा वाद ओढवून घेतला आहे. एका सभेत बोलताना त्यांनी चक्क महात्मा गांधींच्या हत्येचे समर्थन केले आहे. "नथुराम गोडसेने गांधींच्या छातीत गोळी ठोकली, म्हणूनच आज हिंदू सुरक्षित आहेत," अशा आशयाचे विधान त्यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल होताच सर्वच स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे.
भिवंडीच्या सभेत मुनी निलेश चंद्र यांचे भाषण सुरू असताना त्यांनी फाळणी आणि गांधीहत्येचा संदर्भ दिला. ते म्हणाले, "जर गोडसेने त्या दिवशी धाडस दाखवले नसते, तर आज परिस्थिती वेगळी असती. हिंदू समाज आज कलमा पढताना दिसला असता." या विधानामुळे सभेतील वातावरण तर तापलेच, पण आता याचे पडसाद राज्यभर उमटण्याची शक्यता आहे. निलेश चंद्र म्हणाले की गांधी तुमचे प्रेम फक्त चंद्र आणि ताऱ्यांवर होते. त्याचे फळ आम्हाला फाळणीतून मिळाले. जर गोडसेने छातीत गोळी मारली नसती तर आज संपूर्ण हिंदूी समाज कलमा पढत असता असं वक्तव्य त्यांनी केलं.
मुनी निलेश चंद्र हे त्यांच्या आक्रमक आणि वादग्रस्त विधानांसाठी ओळखले जातात. मात्र, यावेळी त्यांनी थेट राष्ट्रपित्याबद्दल आणि त्यांच्या हत्येबद्दल भाष्य केल्याने कायदेशीर पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. भिवंडीतील या सभेला उपस्थित असलेल्या काही नागरिकांनी या विधानाचा निषेध केला असून प्रशासनाने यावर कडक पावले उचलावीत, अशी मागणी केली आहे. शिवाय त्यांच्या वक्तव्याचे पडसाद ही उमटत आहे. अशा मुनीवर कडक कारवाई झालीच पाहीजे त्या शिवाय ते सरळ होणार नाहीत अशा ही प्रतिक्रीया उमटत आहेत.
देशात नथुराम गोडसे या हत्याऱ्याचे उद्दातीकरण कधी ही खपवून घेतले जाणार नाही अशा सुर उमटत आहेत. जैन मुनी निलेश चंद्र याने पहिल्यांदाच असे वक्तव्य केले आहे अने नाही. ते नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करून प्रसिद्धीत राहण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र यावेळी त्यांनी सर्व सीमा ओलांडल्या आहेत. त्यांनी थेट महात्मा गांधींच्या हत्येचे समर्थन करत खून नथूराम गोडसेचे समर्थन खुलेआम अजंडा राबवल्याचं स्पष्ट होत आहे. त्यांच्या या वक्तव्याशी जैन समुदाय ही समर्थन करणार नाही. हा समुदाय अहिंसा आणि शांतीसाठी ओळखला जातो.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world