Amravati Municipal Corporation Election Latest News : अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यापासून भाजपच्या माजी खासदार नवनीत राणा भाजप कार्यकर्त्यांच्या निशाण्यावर आहेत. भाजपच्या 22 उमेदवारांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र राणांविरोधात पत्र पाठवलं आहे. नवनीत राणा यांना पक्षविरोधी प्रचार केला,असा आरोप या उमेदवारांनी पत्राद्वारे केला आहे.राणांची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणीही या उमेदवारांनी फडणवीसांकडे केली आहे.या 22 उमेदवारांपैकी 2 उमेदवार अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीत विजयी झाले आहेत. तर उर्वरित 20 उमेदवारांचा पराभव झाला आहे. या कार्यकर्त्यांनी आरोप केला आहे की, अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी भाजप उमेदवारांना “डमी”(नाममात्र उमेदवार)म्हटलं होतं.तसच पती रवि राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या उमेदवारांना “भाजपचे खरे उमेदवार”असल्याचंही राणा म्हणाल्या होत्या.
भाजप उमेदवारांचा आरोप काय?
पराभवाचा सामना करणाऱ्या 20 उमेदवारांसह विजयी झालेल्या 2 उमेदवारांनी शनिवारी फडणवीस यांना पत्र पाठवले आहे.त्यांनी असा आरोप केला आहे की, त्यांचा पराभव जनतेमुळे नाही,तर नवनीत राणा यांच्या कारणामुळे झाला आहे.“आम्ही पक्षाचे निष्टावंत आणि मेहनती कार्यकर्ते आहोत. तसच आम्ही समाजाशी जोडलेले आहोत. पण या निवडणुकीत आमचा पराभव विरोधकांमुळे नाही,तर वरिष्ठ भाजप नेत्या नवनीत राणा यांनी पक्षाच्या विरोधात उघडपणे प्रचार केल्यामुळे झाला आहे.”, असंही या उमेदवारांनी म्हटलं आहे.
नक्की वाचा >> पुणे पाठोपाठ इंदापुरात धमाका! राष्ट्रवादीचा मोठा नेता भाजपच्या गळाला, मंत्री दत्ता भरणेंचं राजकारण संपवणार?
या उमेदवारांनी नवनीत राणा यांची भाजपमधून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. त्यांना पक्षातून बाहेर काढले नाही तर भविष्यात त्या अमरावती शहरातील पक्षाचे अस्तित्व संपवून टाकतील, असंही त्यांनी पत्रात नमदू केलं आहे. अमरावती महानगरपालिका निवडणुकीपूर्वी भाजप आणि आमदार रवि राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाने युती तोडली होती.परंतु,नवनीत राणा भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी पुढेही काम करतील, असंही भाजपच्या एका स्थानिक नेत्याने म्हटलं होतं.
अमरावतीत भाजप 25 जागांवर विजयी
अमरावती महापालिकेच्या 87 सदस्यीय सभागृहात भाजपला 25 जागा मिळाल्या आहेत. युवा स्वाभिमान पक्ष आणि काँग्रेसला 15-15,एमआयएमला 12,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 11,शिवसेना आणि बहुजन समाज पक्षाला 3-3, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला 2 आणि वंचित बहुजन आघाडीला 1 जागा मिळाली आहे.मागील निवडणुकीत भाजपने 45 जागा जिंकल्या होत्या आणि युवा स्वाभिमान पक्षाला 3 जागा मिळाल्या होत्या.
या प्रकरणावर माजी खासदार नवनीत राणा यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.