BMC Mayor 2026 Latest News : मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीने 118 जागा जिंकून बहुमत मिळवलं आहे. 25 वर्षानंतर आता पहिल्यांदाच भाजपचा महापौर विराजमान होणार आहे. शिवसेना ठाकरे गटाला धक्का देत भाजपने या निवडणुकीत जोरदार मुसंडी घेतली आहे. अशातच मुंबईचा पुढचा महापौर कोण होईल,याबाबत अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत. याबाबतचा निर्णय जानेवारी महिन्याच्या अखेरीस होण्याची शक्यता आहे.
भाजपने बीएमसीमध्ये 89 जागांवर विजय मिळवला आहे. शिवसेना (UBT) ने 65 जागा जिंकल्या आहेत. तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 29 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. दुसरीकडे काँग्रेस 24 जागा जिंकून तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनला आहे.एआयएमआयएमला 8,मनसेला 6,राष्ट्रवादी काँग्रेसला 3,समाजवादी पक्षाला 2 आणि राष्ट्रवादी काँग्रेस (SP)ने फक्त एक जागा जिंकली आहे. महापौरपदाच्या आरक्षणाची लॉटरी सिस्टम कशी असते? याबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती.
नक्की वाचा >> BMC Election 2026 : निकालानंतर काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा उफाळली, बड्या नेत्याची गायकवाडांना हटवण्याची मागणी
कशी असते लॉटरी सिस्टम?
सूत्रांच्या माहितीनुसार, महायुती आता महापौर निवडण्याच्या प्रक्रियेत सक्रिय झाली आहे.परंतु, याबाबतचा सस्पेन्स अजूनही कायम आहे. पण हा सस्पेन्स या महिन्याच्या अखेरीस संपण्याची शक्यता आहे.रिपोर्टनुसार,पुढील आठवड्यात नगर विकास विभाग महापौरपदाच्या आरक्षणासाठी लॉटरी काढणार आहे.ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दहा दिवसांनी महापौर निवडणुकीची प्रक्रिया पार पडेल. त्यामुळे जानेवारी महिन्याच्या शेवटच्या दिवसांतच मुंबईला नवा महापौर मिळू शकेल, हे जवळपास स्पष्ट झालं आहे.
नक्की वाचा >> Pimpari-Chinchwad Winners List : पिंपरी-चिंचवडच्या सर्व 32 प्रभागाच्या विजयी उमेदवारांची यादी, वाचा सर्व नावे
महापौर निवडीची प्रक्रिया
महापौर पद कोणत्या वर्गासाठी (उदा.सर्वसाधारण,महिला,मागासवर्ग इ.) आरक्षित राहील? याबाबतचे निर्णय विकास विभाग लॉटरीच्या माध्यमातून ठरवले जातात. त्यानंतर पात्र उमेदवार त्यांचे नामनिर्देशनपत्रे दाखल करतात.बीएमसीचे निवडून आलेले नगरसेवक विशेष सभेत मतदान करतात.ज्याला सभागृहात बहुमत (एकूण नगरसेवकांच्या संख्येच्या निम्म्यापेक्षा जास्त)मिळते, त्या उमेदवाराची महापौर म्हणून निवड होते.जर कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नसेल,तर आघाडी किंवा महायुतीची भूमिका निर्णायक ठरते. सध्याच्या राजकीय गणितांमध्ये आणि बीएमसी निवडणुकीच्या निकालांच्या पार्श्वभूमीवर महापौर पदासाठी सुरू असलेली रस्सीखेच पाहता राजकीय पटलावर मोठे बदल होण्याची शक्यता आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world