महायुतीत सध्या एकमेकांमध्ये जुंपल्याचं चित्र आहे. आधी पासूनच शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष होता. त्यातून खटके उडाल्याचेही सर्वांनी पाहिले. त्यात आता भर म्हणून भाजप आमदाराने ही राष्ट्रवादीवर जाहीर टीका केली आहे. शिवाय अजित पवारांनाच लक्ष्य केलं आहे. अजित पवारांवरच भाजप आमदाराने टीका केल्याने राष्ट्रवादीकडूनही त्याच पद्धतीने प्रत्युत्तर येणार यात काही वाद नाही. त्यामुळे महायुतीतली ही अंतर्गत धुसफूस आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
धनगर समाजाच्या योजनांत निधी मिळत नाहीत. अजित पवार हे त्यासाठी जबाबदार आहेत. अजित पवार हे निधी अडवत आहेत. असा आरोप भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. पवार निधी अडवतात ही बाब खरी आहे असं ही ते म्हणाले. मात्र सध्या अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचा विषय आहे. मात्र याबाबत जयंतीनंतर मुख्यमंत्र्यांना आपण पत्र लिहीणार आहे. अशी माहिती आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली आहे.
शिंदेच्या शिवसेनेच्या आमदारांनी अजित पवार यांच्याकडून निधी मिळत नाहीत. अशी तक्रार थेट अमित शहा यांच्याकडे केली होती अशी चर्चा आहे. यानंतर आता भाजप आमदार ही अजित पवार यांच्याकडून निधीची अडवणूक होत असल्याबद्दल नाराजी व्यक्त करत आहेत. त्यामुळे निधीवरून सरकार मधील 3 पक्षात धुसफूस वाढताना दिसत आहे. महाविकास आघाडीच्या काळातही हाच आरोप अजित पवारांवर झाला होता.
आमदार पडळकर हे पंढरपुरात आले होते. यावेळी अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त होणाऱ्या कार्यक्रमांची माहिती पडळकर यांनी दिली. यावेळी अजित पवार यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली. पण याबाबत अहिल्यादेवींच्या जयंती नंतर आक्रमक होणार असल्याचे संकेत दिले आहेत. मात्र या सर्वांवरून महायुतीत सर्व काही ठिक नाही हे पुन्हा एकदा समोर आलं आहे.