Nishikant Dubey vs Raj Thackeray : मुंबई महापालिकेत शिवसेना (UBT)आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना पराभवाच्या उंबारठ्यावर असतानाच भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी ट्वीट करून खळबळ उडवली आहे. संपूर्ण देशाचं लक्ष्य लागलेल्या मुंबई महापालिकेत तब्बल 25 वर्षानंतर पहिल्यांदाच भाजपचा महापौर बसू शकतो. कारण भाजपने या महापालिका निवडणुकीत मुसंडी घेत बहुमताचा आकडा गाठला आहे. त्यामुळे भाजप नेत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ठाकरे बंधूंवर टीका-टिप्पणी सुरू केली आहे. "मुंबईला येऊन उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंना भेटणार..", असं ट्वीट करत दुबेंनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.
निशिकांत दुबेंचं ट्वीट होतंय व्हायरल
निशिकांत दुबे आणि राज ठाकरे यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून शाब्दिक चकमक सुरु आहे.महाराष्ट्रातील उत्तर भारतीयांच्या मुद्यावरून दुबे यांनी राज ठाकरेंवर घणाघाती टीका केली होती.'उत्तर भारतात आलेल्या मराठी लोकांना पकडून पकडून मारणार',असा इशारा दुबे यांनी दिला होता.त्यानंतर राज ठाकरेंनीही दुबेंना जशाच तसं उत्तर दिलं होतं. 'दुबे यांना समुद्रात बुडवून बुडवून मारणार',असं राज ठाकरे म्हणाले होते. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत राज ठाकरेंच्या मनसेला मोठा धक्का बसल्याने दुबेंनी ठाकरेंची खिल्ली उडवली आहे.
नक्की वाचा >> मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान देणाऱ्या 'लेडी ओवैसी' आहेत तरी कोण? मुस्लिमांसाठी बनल्या रणरागिनी, "ऐका फडणवीस.."
राज ठाकरेंनीही दुबेंवर केला होता पलटवार
निशिकांत दुबे यांनी राज ठाकरेंना डिवचल्यानंतर त्यांनीही दुबेंवर पलटवार केला होता. राज ठाकरे म्हणाले होते, "मी दुबेंना सांगतो, तुम्ही मुंबईत या..मुंबईच्या समुद्रात तुम्हाला बुडवून बुडवून मारणार. जर कोणी मराठी माणसांचा अपमान केला, तर त्यांचे गाल आणि आमच्या हातांची युती नक्की होईल".मुंबई महानगरपालिका निवडणुकीत महायुतीने बहुमताचा आकडाही पार केला आहे. मात्र, आतापर्यंतच्या कलांमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या पक्षाला अपेक्षित यश मिळालं नाही. विशेषत:राज ठाकरेंच्या मनसेचा मोठा पराभव झाला आहे.