मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यातले वाकयुद्ध काही संपताना दिसत नाही. जरांगे यांची शांतता रॅली नुकतीच नाशिकमध्ये झाली. त्यावरून भुजबळांनी जरांगेंना चांगलेच चिमटे काढले आहेत. पाच लाख लोक मोर्चाला येणार होते असं सांगितलं होतं पण आले आठ हजार. पंचवीस वेळा उपोषण केलं पण तिकडे कुत्रंही फिरकलं नाही. आता 288 उमेदवार उभे करा आणि मुख्यमंत्री व्हा असं आव्हानच भुजबळांनी जरांगे यांना दिलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्या नाशिकच्या शांतता मोर्चावरून त्यांना चिमटे काढले आहेत. पाच लाख लोक जमणार असं सांगितलं होतं. पण पोलीसांनी जो रिपोर्ट दिला आहे त्यानुसार आठ हजार लोक या मोर्च्यात आले होते असं भुजबळ म्हणाले. या मोर्च्यात केवळ आपल्याला शिव्या देण्यात आल्या. त्यावरून मोर्च्यात असणाऱ्यांची संस्कृती समजते. घाणेरडे उच्चार केले जात होते. सुरूवातीला मी जरांगेंनी दिलेल्या शिव्या ऐकून घेतल्या. पण बीडमध्ये जे झालं त्यानंतर मीही शांत बसलो नाही. आता पुन्हा ते शिव्या देत आहेत.
भुजबळांनी यावेळी त्यांच्या उपोषणावरूनही त्यांना सुनावलं. त्यांनी आतापर्यंत 25 वेळा उपोषणं केली. पण त्याकडे कोणी कुत्राही फरकला नाही. त्यांच्याकडे कोणी आता लक्ष ही देत नाही. जरांगे केवळ जातीयवाद करत आहे असा आरोपही या निमित्ताने भुजबळांनी केला. मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढवण्या बाबतही वक्तव्य केलं होतं. त्याची घोषणा ते लवकरच करणार आहेत. त्यासाठी त्यांनी इच्छुकांकडून अर्ज ही मागवले आहेत. मुलाखतीही सुरू केल्या आहेत.
नक्की वाचा - न्यायालयातच वकील कोसळला, न्यायाधीशही धावले; नागपुरात वकिलाचा धक्कादायक शेवट!
त्यावरूनही भुजबळांनी जरांगे यांना चिमटे काढायचे सोडले नाही. मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभेला 288 उमेदवार उभे करावेत. त्यातून जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणावेत. ते निवडून आणले की त्यांना मुख्यमंत्री होता येईल. ते मुख्यमंत्री झाले की त्यांचे सर्व प्रश्न सुटतील असा चिमटा त्यांनी जरांगे यांना काढला आहे. भुजबळांनी केलेली ही टिका जरांगे यांच्या जिव्हारी लागणारी आहे. त्यामुळे तीही त्यांना प्रत्युत्तर देतील हे नक्की आहे.
(नक्की वाचा- '...तर लाडक्या बहिणीला दीड ऐवजी 3 हजार रुपये देऊ')
जरांगे यांची शांतता रॅली संपुर्ण महाराष्ट्रात सुरू आहे. नुकतीच ती नाशिक इथेही झाली. जरांगे यांनी यातून शक्तीप्रदर्श करण्याचे काम केले. विधानसभा निवडणूक लढण्या आधी ते सगळीकडे चाचपणी करत आहेत. त्यासाठी शांतता मोर्चातून ताकद आजमावली जात आहे. मराठवाड्यात त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या पुढेही शांतता रॅली निघणार आहेत. पण नाशिकच्या शांतता रॅलीवर भुजबळांनी टिका केली आहे. अशा वेळी जरांगे काय उत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.