नागपुरात एका वकिलाचा आपल्या कर्मभूमीत धक्कादायक शेवट झाल्याचा प्रकार समोर आला आहे. तलाट इक्बाल कुरेशी (65) नेहमीप्रमाणे सत्र न्यायालयात आले होते. आज त्यांची केस होती. मात्र युक्तिवाद सुरू होण्यापूर्वीच त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. वकिलाच्या निधनाने कोर्टात हळहळ व्यक्त केली जात आहे. कुरेशी यांनी युक्तिवादापूर्वी कोर्ट रूममध्ये हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे स्वत: न्यायाधीश वकिलाला रुग्णालयात घेऊन गेले. मात्र वकिलाला वाचवता आलं नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी 11.30 वाजता कुरेशी जिल्हा न्यायालयात पोहोचले.सातव्या मजल्यावरील सीनियर डिव्हिजन न्यायाधीश एस.बी. पवार यांच्या न्यायालयात त्यांची केस होती. यावेळी विरोधी पक्षाचे वकील धनराजानी युक्तिवाद करीत होते, तेव्हाच कुरेशी बाकावरून खाली कोसळले. ते बेशुद्ध झाल्याचं दिसताच न्यायाधीश पवार तातडीने आपल्या जागेवरून उठले आणि कर्मचाऱ्यांना त्यांना पाणी द्यायला सांगितलं. यानंतर न्यायाधीश पवार स्वत: त्यांना रुग्णालयात घेऊन जात होते. स्ट्रेचर उपलब्ध नव्हता. त्यामुळे कुरेसी यांना खुर्चीवर बसवून खाली आणण्यात आलं. न्यायाधीशांनी आपल्या गाडीतून कुरेशी यांना रुग्णालयात नेलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. मिळालेल्या माहितीनुसार, कुरेशी यांच्या पत्नीचं कोरोनामध्ये निधन झालं होतं. तेव्हापासून कुरेशी एकटे राहत होते.दोन्ही मुलींचं लग्न झालं होतं. कुरेशी यांच्या अचानक झालेल्या निधनाने न्यायालयात वकिलांनी शोक व्यक्त केला आहे.
नक्की वाचा - बंद दाराआड चर्चा समोर आली, दादा- फडणवीसांत काय ठरलं? पाटलांनी सर्वचं सांगितलं
न्यायालयात अपुऱ्या सुविधा...
नागपुरातील जिल्हा न्यायालय परिसरात दररोज आठ हजार वकील काम करण्यासाठी येतात. मोठ्या संख्येत न्यायालयीन कर्मचारी आहे. आपल्या प्रकरणांसाठी मोठ्या संख्येने लोक न्यायालयात येतात. मात्र तरीही न्यायालयात रुग्णवाहिका आणि प्राथमिक उपचाराची सुविधा नसणं दुर्देवी बाब आहे. प्रत्येक न्यायालयात या सुविधा गरजेच्या आहेत. प्राथमिक उपचार मिळाल्यास कमीत कमी रुग्णालयात पोहोचपर्यंत पीडित व्यक्तीवर उपचार करता येऊ शकतात.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world