Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2025: अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत, स्वराज्य संस्थापक, जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची 395 ची जयंती आज जगभरात साजरी होत आहे. शिवरायांची जयंती जगभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांचं युद्धकौशल्य, स्वराज्य, स्त्रीदाक्षिण्य, जाती-पातीच्या पलिकडचं सत्ताकारण अशा पैलूंचे अनेक प्रसंग आज इतिहास अभ्यासक, व्याख्याते जनसामान्यांपर्यंत पोहोचवत आहेत.इतिहासकार, मराठेशाहीचे अभ्यासक निनाद बेडेकर यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराज तसेच मराठ्यांचा इतिहास पुस्तकरुपी मांडलं आहे. निनाद बेडेकर यांच्या अभ्यासातून समोर आलेल्या काही ऐतिहासिक घटनांद्वारे छत्रपती शिवाजी महाराज यांना आणखी समजून घेण्याचा प्रयत्न करुयात.
अमेरिकेत मराठ्यांच्या लढाईचे सँड मॉडेल्स
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या युद्धकौशल्याची भुरळ अमेरिकेलाही पडली. अमेरिकेच्या वेस्ट पॉईंट नावाची सैन्य अकादमी आहे. अमेरिकेचे जनरल हे या अकादमीतून बाहेर पडलेले आहेत. या अकादमीमध्ये दोन सँड मॉडेल्स आहेत, जी आपल्या येथील लढायांची आहे ज्या स्ट्रॅटेजी आणि टॅक्टिक्स शिकवतात. त्यातलं एक मॉडेल प्रतापगडाच्या अफझल खानासोबतच्या लढाईचं आहे. तर दुसरं मॉडेल बाजीरावाच्या 1728 पालखेडच्या लढाईचं आहे. बाजीरावाने या लढाईत निझाम उल मुल्कचा पराभव केला होता. ऑक्सफर्ड मॅनेजमेंट डिक्शनरीतील बहुतांश शब्द देखील युद्धभूमीतून आले आहेत.
अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला
अफजल खानाला भेटण्यासाठी शिवाजी महाराज तोतया पाठवू शकले असते. मात्र महाराज स्वत: तिथे गेले आणि त्यांनीच अफजल खानाला मारलं. त्यामुळे अनेक लोक महाराजांकडे आले. लिडिंग बॉय एक्झाम्पल हा प्रकार त्यांनी दाखवून दिला. अफजल खानाला स्वत:चं नाव गावाला देण्याची खोड होती. वाईजवळ बावधन गाव होतं त्याचं नाव त्याने अफजलनगर ठेवलं होतं. कोरेगावच्या जवळ रेहमतपूर नावाचं गाव होतं. त्याचं खरं नाव कुमठं बुद्रुक होतं. त्याला अफजलखानाने रेहमतपूर नाव ठेवलं होतं. आणखी काही गावांनाही अफजल खानाने आपली नावे दिली होती.
अफजल खानाने स्वत:चा शिक्का कोरला होता. त्याचा मजकूर होता की, "उच्चातील उच्च स्वर्गाला जरी विचारले की या भूतलावरील श्रेष्ठ व्यक्ती कोण आहे? तर तस्बीय म्हणजेच जप माळेचा प्रत्येक मणीही म्हणेल अफजल...अफजल...." ही त्याची गैरसमजूत होती. गैरसमजात जगणाऱ्या अफजल खानाला शिवाजी महाराजांनी 10 मिनिटांत ठोकला. अफजल खानाची भाषा ही फार आक्रमक होती. माझं ऐकले नाही तर तुम्हाला कुटुंबासह घाण्यात घालून पिळून काढून मारेन अशी भाषा त्याने पत्रात वापरली होती.
शिवाजी महाराजांच्या वकिलांनी काय वकिली केली माहिती नाही, मात्र ती अजरामर होती. अफजल खानाला वाईवरून खाली आणायचा. रडतोंडीचा घाट उतरून तो खाली आला की त्याच्या परतीच्या सगळ्या वाटा बंद करायच्या असं ठरलं होतं. अफजल खान पिलाजी मोहिते, शंकराजी मोहिते, पैलवान खान, रहीम खान, अब्दुल सईद आणि बडा सईद (सय्यद बंडा) होता. शिवाजी महाराजांसोबत काताजी इंगळे, येसाजी कंक, कोंडाजी कंक, जीवा महाला, संभाजी कावजी, सुरजी काटके, कृष्णाजी गायकवाड, विसाजी मुरंबक, संभाजी करवर आणि सिद्धी इब्राहीम खान हे होते. शिवाजी महाराजांसोबतचे सगळे सहाजण जिवंत राहिले आणि अफजल खानासोबत आलेले सगळेजण मारले गेले.
शाहिस्तेखान हा औरंगजेबाचा मामा होता. शाहिस्ता ही त्याला दिलेली पदवी आहे. 1626 साली जहांगीराने त्याला ही पदवी दिली होती. बादशाहाची जणू प्रतिमा असा या पदवीचा अर्थ होता. चाकणचा भुईकोट किल्ला जिंकण्यापलिकडे त्याने काहीही प्रयत्न केला नाही. पुण्यात 3 वर्ष तो नाचगाण्यात मश्गुल होता. शाहिस्तेखानाच्या मुलीच्या लग्नानिमित्ताने पुण्यात 3 दिवस सुट्ट्या देऊन टाकल्या होत्या. शाहिस्तेखान काहीही करत नसल्याने शिवाजी महाराजच पुण्यात उतरले. शिवाजी महाराजांनी वेगवेगळ्या वेळेला आपली लोकं पुण्यात घुसवली होती. शिवाजी महाराज स्वत: तिथपर्यंत गेले होते. तुम लडो हम कपडे संभालते है असं केलं नाही. यामुळे शिवाजी महाराजांबद्दल अनेक अफवा पसरल्या. शिवाजी महाराज एकाचवेळी अनेक ठिकाणी असतो, तो गुप्त होतो, पक्षासारखा उडून जातो. त्याला शिवाजी महाराजांनी काऊंटर करण्याचा प्रयत्न केला नाही.
फ्लॉलेस प्लॅनिंग
शिवाजी महाराज आणि औरंगजेबाची एकदाच भेट झाली. 12 मे 1666 ला ही भेट झाली. औरंगजेबाजी बहीण जहाँ आरा, वजीर जाफर खान अशी बरीच मंडळी औरंगजेबाला भेटायला गेले होते. त्यांनी शिवाजी महाराजांना कठोर शासन करा, ठार मारा असे म्हणाले होते. शिवाजी महाराजांनी हेरांवर बरेच खर्च करायचे. मार्केटिंग विभागाला आपली प्रतिस्पर्धी कोण आहे, डिलर्स नेटवर्क काय आहे याची बित्तंबातमी लागते. तसे शिवाजी महाराजांच्या हेरांचे होते. स्वराज्याचे हेरखाते हे प्रचंड तगडे होते.
8 वर्षांत 260 किल्ले ताब्यात घेतले
आग्र्याहून शिवाजी महाराज परत आले तेव्हा त्यांच्याकडे 18 किल्ले होते. पुढच्या सव्वातीन वर्षांत महाराजांनी SWOT अॅनालिसिस म्हणतात तसं केलं होतं. आपले आणि शत्रूच्या कमजोरी ओळखल्या. त्यांनी राजधानी रायगडला नेली. घोडदळ वाढवलं, शत्रूंच्या शिबिरात खोलवर जाण्यासाठी हा निर्णय घेतला होता. स्वत:चा घोडा असतो त्याला शिलेदार म्हणतात, सरकार घोडा देतो तो वापरतो त्याला बारगीर म्हणतात. असं सगळं मिळून दीड लाखांचे घोडदळ होते. त्यानंतर 4 फेब्रुवारी 1670 ला कोंडाणा किल्ला तानाजी मालुसरेंनी जिंकला तो स्वराज्यात आलेला 19 वा किल्ला होता. पुढच्या 8 वर्षांत शिवाजी महाराजांच्या ताब्यात 260 किल्ले आले होते. साल्हेर हा महाराष्ट्रातला सर्वोच्च किल्ला आहे. जिंजी मद्रासच्या दक्षिणेला दीडशे किलोमीटरवर आहे. लाईन ऑफ डिफेन्स महाराजांनी तयार केली. जिंजीच्या किल्ल्याने राजाराम महाराजांना 8 वर्ष आसरा दिला. ही सामान्य गोष्ट नाही, त्यासाठी दूरदृष्टी लागते, ती शिवाजी महाराजांकडे होती. धोक्यांचा आधीच विचार करायचे, त्यानुसार पावले टाकायची. 260 किल्ल्यांसाठी महाराजांनी हेच केलं होतं. कोणता किल्ला ताब्यात घ्यायचा, कसा घ्यायचा. माणसं वर कशी न्यायची, दारूगोळा-तोफा वर कशा न्यायच्या याचं नीट प्लॅनिंग केलं होतं.
स्त्रीयांचा कायम आदर केला
धारवाडजवळ बेलवडी नावाचं गाव आहे तिथे मल्लमा नावाची बाई होती, तिचा नवरा मल्ला सर्ग्या वारला होता. या बाईची माणसं महाराजांची घोडी पळवत होती. महाराजांनी एका सरदाराला तिचा बंदोबस्त करायला पाठवलं होतं. त्या सरदाराने बंदोबस्त केला मात्र त्या स्त्रीशी गैरवर्तन केलं, हे महाराजांना कळाल्यानंतर त्या सरदाराचे डोळे काढले होते. गुन्हा सिद्ध झाला तर तत्काळ शिक्षा असा नियम होता. उत्तम काम केलं की तत्काळ बक्षीस हा दुसरा नियम होता. त्यानंतर मल्लमाने कानडीतून शिवाजी महाराजांवर काव्य केलं होतं. शिवाजी महाराजांनी अनेकदा कर्नाटकाला मदत केली.
औरंगजेब 20 फेब्रुवारी 1707 ला औरंगजेब मेला, त्याला मराठ्यांवर विजय मिळवता आला नाही. छत्रपतींचे निधन झाल्यानंतर औरंगजेबाने म्हटले होते की, हा एक माणूस असा होता ज्यात राज्य निर्माण करण्याची क्षमता होती. त्याने शरण आलेल्या शत्रूंच्या स्त्रियांशी देखील कधीही गैरवर्तन केले नाही.
किल्ल्याला दुर्ग पर्यायी शब्द दिला
राज्याभिषेक झाल्यानंतर रघुनाथपंत हणुमंतेंना बोलावले ते उत्तम वकील होते. त्यांना महाराजांनी सांगितले की आपली भाषा लुप्त होत चालली आहे. त्यामुळे यावनी शब्दांना पर्यायी शब्द शोधा. त्यानंतर धुंडीराज लक्ष्मण व्यास यांना सोबत घेऊन 1400 शब्दांची डिक्शनरी तयार केली. राजकोश असं म्हणतात त्याला. किल्ला हा अरबी शब्द असून त्याला पर्याय म्हणून दुर्ग बालेकिल्ल्याला आदित्यका, माचीला उपत्यका असं नाव दिलं होती. कोष निर्माण करणारे महाराज पहिले होते. त्यांनी बाळाजी आवजींना बोलावलं आणि विचारलं की पत्रांचे प्रकार किती आहेत? आवजींनी सांगितले की 80 आहेत. महाराजांनी त्या सगळ्यांचे मायने लिहायला सांगितले. महाराजांनी आपली भाषा जगवली. महाराजांनी प्रत्येकाच्या भूमिका ठरवून दिल्या. मराठीतील पत्रलेखन शास्त्र हे पुढे नेण्यास महाराजांची महत्त्वाची भूमिका ठरते.