उद्धव ठाकरे यांनी पुढच्या तीन महिन्यात राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येईल असे वक्तव्य केले होते. त्यानंतर मराठा आरक्षणासह अन्य विषयही मार्गी लावले जातील असे म्हटले होते. त्याचा चांगलाच समाचार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. लोकसभेत जे झाले ते विधानसभेत होणार नाही. मग यांचे सरकार कसे येणार? महायुती सध्या बहुमताच्याही बरीच पुढे असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
एकनाथ शिंदे यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टिका केली. मुख्यमंत्री असताना अडीच वर्ष ते घरात होते. असं असताना त्यांचे सरकार कसं येणार? सरकारमध्ये यायचं असेल तर लोकांमध्ये राहावं लागतं. त्यांना भेटावं लागतं. फिल्ड वर उतरावं लागतं असं शिंदे म्हणाले. लोकसभेत फेक नरेटिव्ह पुढे लोक फसले. पण आता विधानसभेला तसे होणार नाही. लोक सर्व काही ओळखतात. ते आता आमच्या बरोबर आहे. त्यामुळे त्यांचे सरकार कसे येणार असा प्रश्न शिंदे यांनी उपस्थित केला. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर शिंदे सरकारने घेतलेले चुकीचे निर्णय रद्द करणार असल्याचे ठाकरे म्हणाले होते.
ट्रेंडिंग बातमी - ठाकरेंची मराठा आरक्षणावर रोख 'ठोक' भूमिका, कोणाची पंचाईत होणार?
मराठा आरक्षणावरून उद्धव ठाकरे यांची टोलवा टोलवी सुरू आहे. त्यांच्याकडे कोणताही मार्ग नाही. त्यांना निर्णयही घ्यायचा नाही. त्यामुळेच आरक्षणाचा चेंडू त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कोर्टात टाकला आहे. हे त्यांचे अपयश आहे. आमच्या सरकारने मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिले आहे. कुणबी नोंदीही सापडत आहेत. दाखले देण्याचे कामही सुरू आहे. मराठा समाजासाठी अनेक योजनाही आखल्या गेल्या आहेत. त्याचा फायदा मराठा तरूणांना होत आहे. अशा वेळी त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करण्याची गरज आहे. पण ते तसे करत नाहीत.
( नक्की वाचा : Exclusive : आता उपोषण नाही इलेक्शन! जरांगे पाटलांचं ठरलं, वाचा संपूर्ण प्लॅन )
त्यांना दोन समाजात तेढ निर्माण करायची आहे, असा आरोपही एकनाथ शिंदे यांनी केला. त्यावर त्यांना केवळ आपली राजकीय पोळी भाजायची आहे. सरकारने सर्व पक्षीय बैठक बोलावली होती. पण त्या बैठकीला ते आले नाहीत. कोणाला येवूही दिले नाही. त्यांना महाराष्ट्र पेटत ठेवायचा आहे असा आरोपही यावेळी एकनाथ शिंदे यांनी केला. त्यामुळे येणाऱ्या काळात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात आणखी वाकयुद्ध रंगण्याची दाट शक्यता आहे.