शरद पवारांचे मिशन पिंपरी- चिंचवड, भाजपला देणार दे धक्का?

शरद पवारांनी पिंपरी चिंचवडवर लक्ष केंद्रीत केले आहे. इथे भाजपचा बडा नेता शरद पवारांच्या गळाला लागण्याची दाट शक्यता आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
चिंचवड:

लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवार हे विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत  शरद पवारांनी आजही आपण पॉवरफुल असल्याचे दाखवून दिले होते. त्यानंतर ते विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रत्येक मतदार संघ पिंजून काढत आहेत. शिवाय काही मतदार संघातील नेत्यांना आपल्याकडे खेचण्याची रणनितीही आखत आहेत. गेल्या काही दिवसात पवारांना अनेक नेते येवून भेटले आहेत. त्यात काहींची प्रवेश झाला आहे तर काहींची वेट अँण्ड वॉचची भूमिका आहे. आता शरद पवारांनी पिंपरी चिंचवडवर  लक्ष केंद्रीत केले आहे. इथे भाजपचा बडा नेता शरद पवारांच्या गळाला लागण्याची दाट शक्यता आहे. तशी जोरदार चर्चा सध्या पिंपरी चिंचवडमध्ये ऐकायला मिळत आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

पिंपरी चिंचवड हा मतदार संघ तसा राष्ट्रवादी काँग्रेसचा गड होता. मात्र या गडाला भाजपच्या लक्ष्मण जगताप यांनी सुरूंग लावला. त्यानंतर राष्ट्रवादीला हा मतदार संघ आपल्या ताब्यात घेता आला नाही. त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांनी भाजपच्या तिकीटावर पोटनिवडणुकीत बाजी मारली. त्या पुन्हा या मतदार संघातून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. मात्र पिंपरी चिंचवडचे शहर अध्यक्ष आणि त्यांचे दिर शंकर जगताप हे चिंचवडमधून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. त्यांनी तशी तयारीही केली आहे. त्यांना उमेदवारी मिळेल अशी शक्यताही वर्तवली जात आहे. अशा वेळी अश्विनी जगताप राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून मैदानात उतरण्याची तयारी करत आहेत अशी चर्चा आहे. 

ट्रेंडिंग बातमी -  भाजपचा अंतर्गत सर्वे, पक्षानं घेतला धसका? चाणक्य मैदानात उतरणार

अशी चर्चा जरी असली तरी अश्विनी जगताप आणि शंकर जगताप यांनी याबाबत अधिक बोलणे टाळले आहे. मात्र सुत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार पडद्या मागून अनेक घडामोडी घडत आहेत. अश्विनी जगताप यांनी पती लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत विजय मिळवला होता. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तगडे आव्हान त्यांच्या समोर होते. तरही  हे आव्हान मोडीत काढत त्या विजयी झाल्या. महाविकास आघाडीत झालेल्या बंडखोरीचा फायदा अश्विनी जगताप यांना झाला. यावेळी त्यांना पुन्हा उमेदवारी मिळेल अशी आशा आहे. 

ट्रेंडिंग बातमी - 'सिल्लोड आहे की पाकिस्तान , इथं राहायचं की...' दानवेंचे वादग्रस्त वक्तव्य, वाद पेटणार?

तसं पाहीलं तर या मतदार संघात अजित पवारांना विशेष रस आहे. जगताप यांच्या निधनानंतर इथे झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीने आपला उमेदवार मैदानात उतरवला होता. त्यानेही जोरदार टक्कर देत लाखभर मतं मिळवली होती. पण महायुतीत ही जागा भाजपला जाणार आहे. त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला या जागेवर पाणी फेरावे लागणार आहे. अशा वेळी अजित पवार गटातील अनेक जण शरद पवारांच्या संपर्कात आहेत. अशा स्थितीत अश्विनी जगताप ही चाचपणी करून पाहात असल्याची चर्चा आहे.