
विधानसभा निवडणुकीची तयारी सर्वच पक्ष करत आहेत. शिवाय आपल्या स्तरावर सर्वेही केले जात आहेत. भारतीय जनता पक्षानेही असा एक निवडणूक पूर्व सर्वे केला आहे. हा सर्वे धक्कादायक असल्याचे सांगितले जाते. त्यात भाजपला फटका बसण्याची शक्यता आहे. मागिल निवडणुकीत भाजपला विदर्भाने साथ दिली होती. मात्र यावेळी याच विदर्भात भाजपला जोरदार धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही स्थिती पाहात परिस्थिती सुधारण्याच्या दृष्टीने भाजपचे चाणक्य समजले जाणारे गृहमंत्री अमित शहा स्वत: मैदानात उतरणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर ते 23 सप्टेबरला नागपूरच्या दौऱ्यावर येत आहेत.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मागिल दोन विधानसभा निवडणुकांमध्ये विदर्भाने भाजपला साथ दिली आहे. भाजपच्या एकूण जागांच्या 33 टक्के जागा या भाजपला विदर्भातून जिंकता आल्या आहेत. विदर्भात विधानसभेच्या एकून 62 जागा आहेत. या जागांचा भाजपने अंतर्गत सर्वे केला आहे. या सर्वे नुसार भाजपला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. 62 पैकी 30 जागाच भाजपला मिळताना दिसत आहेत. तसे झाल्यास एकूण जागांच्या संख्येवर परिणाम होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. सत्तास्थापनेवरही त्याचा परिणाम होवू शकतो. याची गंभीर दखल पक्ष श्रेष्ठींनी घेतली आहे.
त्यामुळे भाजरचे चाणक्य समजले जाणारे गृहमंत्री अमित शहा स्वत: विदर्भाकडे लक्ष देणार आहेत. ते येत्या 23 सप्टेबरला विदर्भात येत आहेत. नागपूरात ते पक्षाची बैठक घेवून विदर्भातल्या प्रत्येक जागेचा आढावा घेतली अशी माहिती आहे. कदाचीत हा कार्यक्रम मागे पुढे होण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. असं असलं तरी विदर्भाचा आढावा शहा स्वत: घेणार आहेत हे निश्चित आहे. विदर्भात कोणत्याही स्थितीत जास्तीत जास्त जागा जिंकण्याची त्यांची रणनिती आहे.
त्यात महायुतीच्या जागा वाटपावरुन नेत्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. विदर्भात अनेक जागांवर एकमत होवू शकलेले नाही. त्यामुळे तिढा निर्माण झाला आहे. विदर्भात काही जागांवर शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाने दावा ठोकला आहे. मात्र, भारतीय जनता पक्षासाठी विदर्भ हा बालेकिल्ला समजला जातो. अशावेळी भाजप आपल्या जागा सोडायला तयार नाही. तर महाविकास आघाडीनेही मोठं आव्हान भाजप समोर विदर्भात उभे केले आहे.
ट्रेंडिंग बातमी - एक देश एक निवडणूक! राज ठाकरेंनी उपस्थित केले प्रश्न अनेक
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला जोरदार दणका देत काँग्रसेने मुसंडी मारली होती. विदर्भात महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले होते. विदर्भात एकूण लोकसभेचे दहा मतदार संघ आहेत. त्या पैकी सात गडचिरोली, रामटेक, भंडारा,अमरावती, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा या जागा महाविकास आघाडीने खेचून आणल्या. तर महायुतीच्या पारड्यात केवळ नागपूर अमरावती आणि बुलढाण्याची जागा आली. नागपूरची जागा सोडता अकोला आणि बुलढाण्यात महायुतीला विजयासाठी संघर्ष करावा लागला होता. लोकसभा निवडणूकीचा विचार करता 62 पैकी 42 विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीला मताधिक्य मिळाले होते. तर महायुतीला केवळ 17 मतदार संघात मताधिक्य होते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world