
लोकसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या. या निवडणुकीत जालना लोकसभा मतदार संघातून तत्कालीन केंद्रीय मंत्री आणि भाजपचे जेष्ठ नेते रावसाहेब दानवे यांना पराभवाचा झटका बसला. या पराभवा मागे महायुतीतील अब्दुल सत्तार असल्याचा आरोप जाहीर पणे रावसाहेब दानवे यांनी केला होता. तर सत्तार यांनीही काँग्रेस उमेदवार कल्याण काळे यांना मदत केल्याचे नाकारले नव्हते. त्यानंतर दानवे यांनी सत्तार यांचा करेक्ट कार्यक्रम करण्याचा विडाच उचलला आहे. आता त्यांनी सत्तार यांच्या मतदार संघात जावून सिल्लोड आहे की पाकिस्तान आहे असा सवाल केला आहे. त्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरादर व्हायरल होत आहे. यामुळे महायुतीत पुन्हा एकदा तणाव निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
रावसाहेब दानवे हे भाजपचे नेते आहेत. त्यांच्यावर भाजपच्या प्रचाराची जबाबदारी आहे. तर अब्दुल सत्तार हे शिवसेना शिंदे गटात आहेत. शिवाय महायुती सरकारमध्ये ते मंत्री ही आहेत. असं असतानाही या दोन नेत्यांमधून विस्तव जात नाही अशी स्थिती आहे. हे दोघे ही एकमेकाला पाण्यात पाहातात. महायुतीती वैगरे काही नाही वैयक्तीक हेवेदावे इथे दिसून येत आहेत. त्याचाच प्रत्यय सध्या सिल्लोडमध्ये दिसून आला आहे. सिल्लोड हा अब्दुल सत्तार यांचा मतदार संघ आहे. या मतदार संघातून जावून रावसाहेब दानवे यांनी थेट अब्दुल सत्तार यांना आव्हान दिले आहे.
ट्रेंडिंग बातमी - भाजपचा अंतर्गत सर्वे, पक्षानं घेतला धसका? चाणक्य मैदानात उतरणार
त्यांचा एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहेत. त्या ते म्हणतात, सिल्लोड है या पाकिस्तान है,इथं राहायचं की पलायन करायचं असं बोलताना ते दिसत आहे. इथं सत्तारांची दहशत असल्याचे ते अधिरेखीत करत होते. यावेळी त्यांनी कश्मीरचा किस्साही सांगितला आहे. काश्मीरमध्ये गेलो. तिथल्या लोकां बरोबर चर्चा केली. फाळणीनंतर तुम्ही पाकिस्तानात गेलात की इथे राहीलात. तिकडे कोण तुमचे नातेवाईक आहेत का? अशी विचारणा केली तर ते म्हणाले की ते लोक कधीच मुस्लीम झाले. तसेच सिल्लोडमध्ये होईल असे दावने बोलताना दिसत आहेत.
सिल्लोडमध्ये कॉलेज बांधलं जात आहे. ते बांधल्यानंतर ही स्थिती निर्माण होईल अशी भितीही त्यांनी यावेळी व्यक्त केली. त्यामुळे जागे व्हा. गेल्या निवडणुकीत एका मताचा भाव 500 रूपये होता. आता हा भाव 1000 असणार आहे. त्यामुळे खरे खानदानी असाल तर पैशाला भुलू नका. धोरणाला मतदान करा. मग तो उमेदवार कोणी असेल तरी चालेल असे आवाहन करताना ते दिसत आहे. त्यामुळे त्यांनी एक प्रकार सिल्लोडमध्ये सत्तार यांच्या विरोधात रणशिंग फुंकले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे महायुतीत तणाव निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.
दरम्यान रावसाहेब दानवे यांच्या या वक्यव्याचे पडसाद सिल्लोड-सोयगाव मतदार संघात उमटले आहेत. पाकिस्तान असा उल्लेख केल्याने तालुक्यातील नागरिकांच्या भावना दुखावल्याचा आरोप केला जात आहे. शिवाय सिल्लोड बंदची हाक देण्यात आली आहे. तर दानवे यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. त्यांच्यावर कडक कारवाई करून तात्काळ अटक करा या प्रमुख मागणीसाठी सिल्लोड येथे निषेध मोर्चाचे आयोजन देखील करण्यात आले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अब्दुल सत्तार विरुध्द रावसाहेब दानवे असा संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world