राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन आता 6 दिवस झाले आहेत. पण, अद्याप खाते वाटप जाहीर झालेलं नाही. विधीमंडळाच्या नागपूर अधिवेशनात हे खातेवाटप जाहीर होईल, अशी चर्चा होती पण, अधिवेशन संपल्यानंतरही खातेवाटप जाहीर झालेलं नाही. हे खाते वाटप कधी जाहीर होणार याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
विधीमंडळाचं नागपूर अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नागपूरमध्ये पत्रकार परिषद झाली. त्यावेळी मुख्यमंंत्र्यांनी खातेवाटपाच्या प्रश्नावर महत्त्वाची घोषणा केली. खातेवाटप लवकरच जाहीर करण्यात येईल. लवकरच याचा अर्थ ते आज होऊ शकतं तसंच उद्याही होऊ शकतं, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहीर केलं.
राज्य सरकारमध्ये सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार आणि 39 मंत्री आहेत. त्यामध्ये भाजपाचे 19, शिवसेनेचे 11 आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 जणांचा समावेश आहे. या सर्व मंत्र्यांनी 16 डिसेंबर रोजी शपथ घेतली आहे. त्यानंतर अद्याप खातेवाटप जाहीर झालेलं नाही. त्यामुळे संपूर्ण अधिवेशनात हे बिनखात्याचे मंत्री आहेत.
( नक्की वाचा : Devendra Fadnavis : बीडसारखाच पीक विमा घोटाळा आणखी काही जिल्ह्यात...CM फडणवीसांचं मोठं वक्तव्य )
17 विधेयकं मंजूर
विधीमंडळाचं नागपूरमध्ये झालेलं हिवाळी अधिवेशन सहा दिवसांचं झालं. त्यापूर्वी तीन दिवस मुंबईत छोटं अधिवेशन झालं होतं. प्रत्येक पाच वर्षांनी नव्यानं निवडणुका होतात त्यावेळी पहिलं अधिवेशन हे छोटं असतं. ते पुरवण्या मागण्यांसाठी होतं. पण, या सहा दिवसांमध्ये भरगच्च काम झालं आहे. विशेषत: 17 विधेयकं चर्चा करुन मंजूर करण्याचं काम राज्य सरकारनं केलं आहे, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक हे संयुक्त चिकित्सा समितीकडं आपण पाठवलं आहे. अर्बन नक्षलवाद आणि फ्रंटल ऑर्गनायझेशनबाबत नक्षल पीडित सर्व राज्यांनी या प्रकारचं विधेयक केलं आहे. शिंदे साहेब मुख्यमंत्री आणि मी गृहमंत्री असताना याचा मसुदा तयार केला होता. पण, याबाबत अनेक अफवा पसरवल्यानं आम्ही ते मांडले नाही. याबाबत विरोधकांनी कोणतीही मागणी न करता संयुक्त चिकित्सा माध्यमातून सर्वांनी मत मांडवं यासाठी आम्ही हे विधेयक समितीकडं पाठवलं आहे. सर्वपक्षीय 21 सदस्यांकडं ही समिती तयार करण्यात आली आहे, असं फडणवीस म्हणाले.
( नक्की वाचा : Shinde vs Thackeray : '... हम बुके दे के घर जाते है,' दानवेंचं नाव घेत शिंदेंचे ठाकरेंवर बाण )
अजित पवार का नव्हते?
राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार या पत्रकार परिषदेला अनुपस्थित होते. त्यावर मुख्यमंकत्र्यांनी सुरुवातीलाच स्पष्टीकरण दिलं. राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार हे दुपारीच माझी परवानगी घेऊन बीड आणि परभणीतील घटनांमधील पीडितांची भेट घेण्यासाठी गेले आहेत. माझी माध्यमांना विनंती आहे, अजितदादा नाराज अशी बातमी कुठेही लावू नये, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.