मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील गरजू रूग्णांना अत्यावश्यक आरोग्यसेवा पुरविण्यासाठी, आर्थिक सहाय्य देण्याकरिता मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष कार्यरत आहे. या कक्षात सादर झालेल्या अर्जाचा पाठपुरावा करण्यासाठी रुग्ण व त्यांचे नातेवाईक मंत्रालयात येत असतात. नागरीकांना या सेवा त्यांच्याच जिल्ह्यात सहजपणे उपलब्ध व्हाव्यात याकरीता राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात "मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष” सुरु करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे नागरीकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या प्रकरणांची माहिती त्यांच्याच जिल्ह्यात उपलब्ध होणार आहे. यामुळे नागरीकांचा वेळ व पैशाचा अपव्यय टाळता येईल.अशी माहिती मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी दिली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या संवेदनशीलतेमुळे, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या माध्यमातून गंभीर आजारांवरील उपचारांसाठी गरजू नागरिकांना अत्यावश्यक आर्थिक मदत पुरवली जात आहे असं नाईक म्हणाले. या सेवांचा मोठ्या प्रमाणावर लाभ राज्यांतील गरजू रुग्णांना घेता यावा यासाठी राज्यात सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात "मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष सुरू करण्यात येणार आहे. संबंधित जिल्ह्यातील मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षास प्राप्त झालेल्या अर्जांची सद्यस्थिती नागरिकांना उपलब्ध करुन देणे व समस्यांचे निराकरण करणे, कक्षामध्ये आलेल्या रुग्णांना नातेवाईकांना अर्ज भरण्यास सहाय्य करणे, मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून आर्थिक मदत झालेल्या रुग्णांची रुग्णालयात जाऊन भेट घेणे, मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाबाबत जनजागृती आणि प्रसिध्दी करणे, जिल्ह्यातील आपत्तीच्या ठिकाणी भेटी देणे तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षामार्फत अर्थसहाय्य देण्याकरिता आजारांचे पुनर्विलोकन करणे व अर्थसाहाय्याची रक्कम नव्याने निर्धारित करणे याकरिता राज्यातील तज्ञ डॉक्टरांची समिती स्थापन करण्यात आली आहे.
यामुळे अर्थसहाय्य देण्यात येणाऱ्या आजारांच्या संख्येत वाढ करण्यात येणार असून सरकारच्या इतर योजनेस समाविष्ट असलेले आजार वगळण्यात येणार आहेत. उपचारांचा खर्च दिवसेंदिवस वाढत असून अर्थसाहाय्याच्या रकमेचा देखील समितीमार्फत आढावा घेण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख नाईक यांनी सांगितले. मुख्यमंत्री कार्यालयातील "मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षा" कडून अनेक दुर्धर आजारांवरील उपचारांसाठी येणाऱ्या खर्चाकरीता रुग्णांना संबंधित रुग्णालयामार्फत आर्थिक सहाय्य देण्यात येते. तसेच आपत्ती प्रसंगीही आर्थिक मदत देण्यात येते. या अनुषंगाने मदत मिळविण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षामध्ये असंख्य अर्ज प्राप्त होतात.
रुग्णांना अधिक सोयीस्कर सेवा उपलब्ध करून देण्यासाठी धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष ऑनलाईन प्रणाली (चॅरिटी पोर्टल) आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष ऑनलाईन प्रणाली (सीएमआरएफ पोर्टल) एकत्रित जोडण्यात येणार आहेत. सद्याच्या प्रचलित कार्यपद्धतीप्रमाणे रुग्णाला दिला जाणारा एओ क्रमांक आणि एम क्रमांक एकत्र करण्यात येणार आहे. या सुविधेमुळे निधीच्या अर्जाची प्रक्रिया अधिक गतिशिल, सोपी होणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world