जाहिरात

CM Relief Fund: लहान भावाच्या एका दानामुळे वाचले मोठ्या भावाचे प्राण, मुख्यमंत्री सहाय्यता निधीची मदत

वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचाराकरिता बोन मॅरो प्रत्यारोपणाचा सल्ला दिला.

CM Relief Fund: लहान भावाच्या एका दानामुळे वाचले मोठ्या भावाचे प्राण, मुख्यमंत्री सहाय्यता निधीची मदत
मुंबई:

अकोला येथील 16 वर्षीय  मुलाला रक्ताचा कर्करोग झाला होता. त्यामुळे त्याच्यावर बोन मॅरो प्रत्यारोपण करणे आवश्यक होते. परंतु उपचाराचा खर्च कुटुंबाला परवडणारा नव्हता. या संकटाच्या काळात 12 वर्षीय लहान भावाने मोठ्या भावाला ‘स्टेम सेल्स दान करून त्याचे प्राण वाचवले. तर आर्थिक मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाने पुढाकार घेतल्याने हे उपचार शक्य झाले. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून यासाठी जवळपास 25 लाखांची मदत देण्यात आली. त्यामुले रुग्णावर उपचार करणे सहज आणि सोपे झाले.  

जीवन (नाव बदलले आहे) हा 16 वर्षीय मुलगा आई-वडिल आणि 12 वर्षीय लहान भावासोबत अकोला येथे राहतो. वडील मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. काही महिन्यांपासून जीवन सतत आजारी पडत होता. सुरुवातीला स्थानिक रुग्णालयात उपचार करूनही प्रकृतीत सुधारणा झाली नाही. त्यामुळे त्याला पुढील तपासणीसाठी मोठ्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तिथे रक्त तपासणीतून जीवनला रक्ताचा कर्करोग असल्याचे निदान झाले. हे ऐकताच जीवनच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. 

नक्की वाचा - Pune News: डोंगर फोडून रस्ता! वेताळ टेकडीवरून जाणाऱ्या रस्त्याचा मार्ग मोकळा, कोर्टाचा मोठा निर्णय

वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचाराकरिता बोन मॅरो प्रत्यारोपणाचा सल्ला दिला. तसेच उपचारासाठी सुमारे 25 ते 30 लाख रुपये खर्चाचा अंदाज वर्तविला. या परिस्थितीत डॉक्टरांनी ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून आर्थिक मदत घेण्याचा सल्लाही दिला होता. जीवनच्या पालकांनी तातडीने मुंबई गाठली.  मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षात धाव घेतली. कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांच्याशी संपर्क साधला. रामेश्वर नाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार तातडीने कार्यवाही केली. त्यातूनच मुंबई येथील जसलोक रुग्णालयात जीवनवर उपचार सुरू करण्यात आले.

नक्की वाचा - Pune MHADA: त्वरा करा, आता नाही तर कधीच नाही! पुण्यात म्हाडाने भन्नाट घरांचा पेटारा उघडला, जाणून घ्या लोकेशन

मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या पुढाकारातून, टाटा ट्रस्टच्या मोठ्या योगदानातून तसेच काही सामाजिक संस्थांच्या सहकार्याने एकूण 25 लाखांची मदत उभी करण्यात आली. 4 सप्टेंबर 2025 रोजी जीवनच्या 12 वर्षीय लहान भावाने अस्थिमज्जा (स्टेम सेल्स) दान केले.  त्यानंतर जसलोक रुग्णालयात जीवनवर यशस्वी बोन मॅरो प्रत्यारोपण करण्यात आले. जीवनप्रमाणेच अनेक गरीब व गरजू रुग्णांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार उपचार करण्यात येत आहेत. दुर्धर आजार झाल्यास कोणीही हताश न होता मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाशी संपर्क साधावा. त्यासाठी नागरिकांनी 1800 123 2211 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी सांगितले.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com