Congress Maharashtra Election Strategy: हरियाणा विधानसभा निवडणुकीत झालेल्या अनपेक्षित पराभवानंतर काँग्रेसनं महाराष्ट्रावर लक्ष केंद्रीत केलं आहे. यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं. काँग्रेसनं सर्वाधिक 13 जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे देशातील उत्तर प्रदेशनंतरचं बडं राज्य असलेल्या महाराष्ट्रात मुख्यमंत्री करण्याचा चंग काँग्रेसनं केला आहे. पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांच्या निवासस्थानी आज (सोमवार, 14 ऑक्टोबर 2024) झालेल्या बैठकीत त्याचंच प्रतिबिंब उमटलं.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काँग्रेस पक्षाध्यक्ष खर्गे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि अन्य केंद्रीय नेत्यांची महाराष्ट्रातील नेत्यांसोबत बैठक झाली. सूत्रांनी दिलेल्या महितीनुसार काँग्रेस नेतृत्त्वानं हरियणातील पराभवाचा उल्लेख करत महाराष्ट्रातील नेत्यांना स्पष्ट निर्देश दिले आहेत. कोणत्याही प्रकारची गटबाजी सहन केली जाणार नाही. महाराष्ट्राचा हरियाणा होऊ द्यायचा नाही, असं केंद्रीय नेतृत्त्वानं बजावलं आहे.
मराठा-ओबीसी संघर्षाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेतृत्त्व अलर्ट मोडवर आहे. या दोनी समाजात सलोखा निर्माण राहिल, हे निश्चित करण्याची सूचना काँग्रेसच्या हायकमांडनं राज्यातील नेत्यांना दिली आहे. राज्यात कोणत्याही परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीचं सरकार आणायचं आहे, असंही केंद्रीय नेतृत्त्वानं दिले आहेत.
( नक्की वाचा : Haryana Elections Results 2024 हरियाणातील काँग्रेसच्या धक्कादायक पराभवाची 5 प्रमुख कारणं कोणती? )
तीन महत्त्वाचे निर्देश
या बैठकीत केंद्रातील वरिष्ठ काँग्रेस नेत्यांनी राज्यातील नेत्यांना तीन महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्रीपदाचा उमेदवाप कोण होणार या वादात पडू नका, हा पहिला निर्देश आहे. काँग्रेसचं केंद्रीय नेतृत्त्व ते निश्चित करेल. या विषयावर पक्षात आणि पक्षाच्या बाहेर कोणतीही गटबाजी करु नये.
महाविकास आघाडीमध्ये वाद असलेल्या कोणत्याही जागांवर चर्चा करु नये. ज्या जागांवर आघाडीमध्ये वाद आहे. उद्धव ठाकरे किंवा शरद पवार यांचा पक्ष त्यावर दावा करतोय त्याचा निर्णय केंद्रीय नेतृत्त्व करेल. या जागांवर कोणत्याही परिस्थितीमध्ये आघाडीमध्ये वाद निर्माण करु नका.
( नक्की वाचा : हरियाणात भाजपाच्या विजयातील सर्वात मोठा फॅक्टर कोणता? एका गोष्टीमुळे बदललं चित्र )
काँग्रेस हायकमांडनं राज्यातील नेत्यांना जाहीरनाम्यावर कोणतीही चर्चा करु नका, असेही निर्देश दिले आहे. त्याचा निर्णय केंद्रीय नेते घेतील. लोकांच्या संपर्कात राहा. त्यांची कामं करा. काँग्रेसनं केलेल्या कामांचं मतदारांना स्मरण करुन द्या. फक्त सत्तारुढ पक्षांच्या टीकेवर अवलंबून राहू नका. अतिआत्मविश्वाचे बळी पडू नका असंही केंद्रीय नेतृत्त्वानं राज्यातील नेत्यांना बजावलं आहे.