आरक्षणाच्या मागणीवर मराठा आणि ओबीसी या दोन मोठ्या समाजातील नेते राज्यात आक्रमक आहेत. सगेसोयऱ्यांसह मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला 13 जूलैपर्यंत डेडलाईन दिलीय. तर, ओबीसी कोट्यातून मराठ्यांना हे आरक्षण देऊ नये यासाठी ओबीसी नेते आक्रमक झाले आहेत. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी या मागणीसाठी जालना जिल्ह्यातल्या वडीगोद्रीमध्ये 10 दिवस उपोषण केलं.राज्यातील ओबीसी नेत्यांच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळानं वडीगोद्रीमध्ये जाऊन हाके यांची भेट घेतली. त्यांच्या विनंतीनंतर हाके यांनी उपोषण स्थगित केलं. त्यापूर्वी छगन भुजबळ यांनी केलेल्या भाषणात मनोज जरांगे यांना लक्ष्य केलं. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेत भाजपाचीही कोंडी केली, अशी चर्चा आता सुरु झाली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाले भुजबळ?
छगन भुजबळांनी वडीगोद्रीमध्ये केलेल्या भाषणात जातीय जनगणनेचा मुद्दा उपस्थित केला. 'शेळ्या मेंढ्या मोजता तर मग माणसांची मोजदाद का करत नाही. आमची जात गणना केली पाहिजे. काही मागितलं तर कोर्टात जातात. कोर्ट विचारतं तुम्ही किती टक्के आहात. आम्ही आकडा कसा सांगायचा. ब्रिटिशांनी गणना केली तेव्हा 54 टक्के होतो. मग आम्ही 10-12 टक्के आहोत असं कसं म्हणता.करा जातगणना (Cast wise census ) अशी मागणी भुजबळ यांनी केली.
देशात आणि महाराष्ट्रात जातीय जनगणना व्हावी अशी आम्ही मागणी केली आहे. नितीशकुमार यांनी ही जनगणना केलीय. विरोधी पक्षांचीही ती मागणी आहे, असं सांगत भुजबळ यांनी भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही जातीय जणगणनेला पाठिंबा असल्याचा दावा केला.
ट्रेंडींग बातमी - 'कुछ लोक अपनी औकात भूल गए है...'OBC आरक्षणावर भुजबळांचा घणाघात
भुजबळांकडून भाजपाची कोंडी?
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी जातीय जनगणना केल्यापासून हा मुद्दा देशभर गाजतोय. काँग्रेस नेते राहुल गांधींसह विरोधी पक्षातील नेत्यांनी हा निवडणुकीत मुद्दा केला होता.भारतीय जनता पक्षानं मात्र याबाबत ठाम भूमिका जाहीर केलेली नाही. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात गरीब हीच सर्वात मोठी जात असल्याचं जाहीर केलं होतं.
गेल्या सहा महिन्यात भाजपानं याबाबतची भूमिका मवाळ केलीय. भाजपानं जातीय जनगणनेला कधीही विरोध केलेला नाही, असं मत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात केलं होतं. आम्ही याबाबत योग्य वेळी भूमिका जाहीर करु असं शाह यांनी जाहीर केलं होतं. पण, त्यानंतर लोकसभा निवडणुकीत भाजपानं हा मुद्दा बाजूला ठेवला होता.
ट्रेंडींग बातमी - लक्ष्मण हाकेंचं उपोषण स्थगित, सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीमध्ये केली घोषणा
आता छगन भुजबळ यांनी फडणवीसांची भूमिका परस्पर जाहीर केली आहे. त्यामुळे भाजपाला याबाबत भूमिका जाहीर करावी लागेल, अशी चर्चा सुरु झाली आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात झालेल्या पराभवानंतर भाजपानं सध्या सावध पवित्रा स्विकारला आहे. त्यातच भुजबळांनी या संवेदनशील विषयात फडणवीसांचं नाव घेत भाजपाला ओढून पक्षाची कोंडी केलीय का? असा सवाल विचारला जात आहे.