
सागर कुलकर्णी, प्रतिनिधी
Ajit Pawar NCP : अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील अंतर्गत हालचालींना वेग आला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि वाल्मिक कराड प्रकरणावरुन विरोधकांकडून मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे. अद्याप तरी मुंडेंनी राजीनामा दिला नसला तरी येत्या काही दिवसात त्यांना राजीनामा देण्याची शक्यता अधिक आहे. दुसरीकडे राज्य शासनाकडून मिळणाऱ्या सदनिका बनावट दस्ताऐवज करुन लाटल्या प्रकरणात कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाने दोषी ठरवले आहे. त्यामुळे कोकाटे यांचं मंत्रिपद धोक्यात आलं आहे. त्याशिवाय त्यांचं विधानमंडळ सदस्यत्वही रद्द होऊ शकतं. या सर्व घडामोडींनंतर आता अजित पवार गटातून दोन्ही मंत्र्यांच्या राजीनाम्यावरुन वाद-प्रतिवाद होत असल्याचं सांगितलं जात आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन विद्यमान कॅबिनेट मंत्री यांचा राजीनामा घेण्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच मत मतांतर असल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे. पुढील आठवड्यात राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. त्यापूर्वी हे प्रकरण निकाली काढावं असं पक्षातील काही नेत्यांचं म्हणणं आहे.
महायुतीतील राष्ट्रवादीच्या दोन कॅबिनेट मंत्र्यांवर मोठा आरोप होत आहे. मुंडे आणि कोकाटे प्रकरणामुळे विरोधकांकडून पक्षावर टोकाचे आरोप केले जात आहे. जोपर्यंत राजीनामा दिला जात नाही तोपर्यंत अशा प्रकारचे आरोप वारंवार केले जातील. विशेष म्हणजे धनंजय मुंडे यांची प्रकृती सध्या ठीक नाही. आधीच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे धनंजय मुंडेंवर अनेक आरोप झाले आहेत. त्यामुळे आरोग्याचं कारण पुढे करीत तूर्तास त्यांचा राजीनामा घ्यावा आणि वाद टाळावा असा मतप्रवाह राष्ट्रवादीच्या काही वरिष्ठ नेत्यांचा आहे.
नक्की वाचा - Beed News : धनंजय मुंडे यांचं टेन्शन वाढलं, आणखी एका प्रकरणामुळे अडचणीत भर
मात्र त्यास पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा विरोध असल्याची माहिती आहे. दुसरीकडे विद्यमान कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिक न्यायालयाने दोषी ठरवलं आहे. राज्य शासनाच्या सदनिका बनावट दस्ताऐवज प्रकरणात त्यांनी वरिष्ठ न्यायालयात धाव घेतली आहे. मात्र जर कोकाटेंना वरिष्ठ न्यायालयात दिलासा मिळाला नाही तर येऊ घातलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातच राष्ट्रवादीची आणि महायुती सरकारची कोंडी होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे न्यायालयाच्या निकालानंतर कोकाटे यांचा तत्काळ राजीनामा घेतला जावा अशी भूमिका राष्ट्रवादीच्या एका गटाची आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात राष्ट्रवादीचे दोन कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांच्या बाबत काही महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world