अमजद खान
डोंबिवलीत भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत प्क्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमा दरम्यान शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक पदाधिकारी यांना भाजपमध्ये घेतल्याने शिवसेना शिंदे गटाने थेट भाजप प्रदेशाध्यक्षांवर हल्लाबोल केला आहे. प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी युतीला तिलांजली दिली. ते युती धर्म पाळत नाहीत. युती नको असेल तर स्पष्ट सांगा असा थेट निशाणा शिंदे गटाचे उप जिल्हा प्रमुख राजेश कदम यांनी रविंद्र चव्हाण यांच्यावर साधला आहे. इतकेच नाही तर आमचे नेते एकनाथ शिंदे यांनी सुद्धा संयम दाखवू नये, अशी भावना व्यक्त केली आहे. त्यामुळे केडीएमसी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेना शिंदे गटात वादाची ठिणगी पडली आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्या उपस्थितीत ठाकरे गट आणि काँग्रेस पक्षाचे अनेक नगरसेवक पदाधिकारी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी संदीप सामंत, मनोज वैद्य, रविंद्र मानकर, राजू सावंत, उपशहर प्रमुख संजय गायकवाड, माजी नगरसेवक दयानंद गायकवाड यांच्यासह काही दिवसांपूर्वी अंबरनाथमधील शिंदे गटाचे नगरसेवक सुरेंद्र यादव यांना देखील भाजपमध्ये प्रवेश दिला गेला. या कार्यक्रमात महापौर पदावर बोलताना रविंद्र चव्हाण यांनी सांगितले, की, महायुतीचा महापौर होणार आहे.
पण लोकांमध्ये संभ्रम आहे की, महायुती म्हणजे नेमका कोणत्या पक्षाचा? हे उघडपणे बोलणे आत्ता उचित ठरणार नाही असं चव्हाण म्हणाले होते. पारदर्शक कारभारासाठी भाजपचा महापौर बसणार हे नक्की आहे. रविंद्र चव्हाण यांच्या कार्यक्रमानंतर शिवेसना शिंदे गटाचे पदाधिकारी संतापले. रविंद्र चव्हाण हे भाजप पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहे. ते देखील युती धर्म पाळत नाहीत. युतीला त्यांनी तिलांजली दिली आहे अशा शब्दात टीका केली आहे.
महायुतीत ठरले होते की, महायुतीतील घटक पक्षातील नगरसेवक पदाधिकारी यांना फोडू नये. तरी देखील नगरसेवक पदाधिकारी फोडण्यात आले. राजेश कदम यांनी रविंद्र चव्हाण यांच्यासह दीपेश म्हात्रे यांच्यावर देखील टिका केली आहे. कदम यांच्या टिकेला भाजप काय उत्तर देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. चर्चा अशीही आहे की, काही तासात भाजपचे काही नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. शिवसेना शिंदे गट भाजपला प्रतिउत्तर देणार आहे. पण ते कधी ते आता पाहावं लागणार आहे.