एकनाथ शिंदे यांनी तडकाफडकी दिल्ली गाठली. त्यानंतर त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी राज्यातल्या भाजप नेत्यांबाबत तक्रारीचा पाढा वाचला. शिंदे यांचा प्रमुख रोख हा भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या दिशेने होता अशी माहिती सुत्रांकडून समोर आली आहे. रविंद्र चव्हाण यांच्या मुळे महायुतीत गैरसमज निर्माण होत आहे. शिवाय कार्यकर्तेही संभ्रमीत होत असल्याचं शिंदे यांनी शाह यांच्या कानावर टाकल्याचं समजत आहे. रविंद्र चव्हाण यांनी सध्या शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांना भाजपमध्ये घेण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे शिंदे हे नाराज असल्याचं बोललं जात आहे.
राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे वारे वाहत आहेत. त्या पार्श्वभूमीवर एकमेकांच्या पक्षातील नेते आपल्या पक्षात घेण्याचा सध्या हंगाम सुरू आहे. त्यात भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. भाजपने तर मित्र पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटातील नेत्यांनाच आपल्या गळाला लावले आहे. खास करून शिंदे यांच्या ताकद असलेल्या ठाणे जिल्ह्यात हे पक्ष प्रवेश होत आहेत. यासाठी प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण पुढाकार घेत आहेत. ही बाब एकनाथ शिंदे यांना खटकली आहे.
विधानसभा निवडणुकीतल्या विजयानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये युतीसाठी अत्यंत पोषक वातावरण आहे. असं या भेटीत शिंदे यांनी शाह यांना सांगितलं. मात्र काही नेते हे वातावरण दुषित करण्याचा प्रयत्न करत आहेत अशी तक्रार शिंदे यांनी केली. त्यामुळे विरोधकांना आयतं कोलीत मिळतंय . मिडियात नाहक उलटसुलट बातम्या येत आहेत. त्यामुळे जनमानसात उगाचच संभ्रम निर्माण होत आहे. कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांमध्ये गोंधळ निर्माण होत आहे. युतीच्या विजयी घोडदौडीत त्यामुळे विनाकारण अडथळे निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशं शिंदे यांनी अमित शाह यांनी सांगितलं.
काही नेते वैयक्तिक स्वार्थापोटी काम करत आहेत. त्यांच्याकडून अशा पध्दतीने काम यापुढे होणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे. तसेच युतीतल्या नेत्यांनी एकमेकांवर टीका टाळली पाहिजे. भाष्य करताना प्रत्येकाने संयमाची आणि सामंजस्याची भूमिका घेणे अपेक्षित आहे अशा भावना त्यांनी शाह यांच्या समोर व्यक्त केल्या. तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिंदे सेनेच्या मंत्र्यांनी भेट घेतली होती. त्यात त्यांनी ही तक्रार करण्याचा प्रयत्न केला होता. पण फडणवीसांनी या सर्वांचीच कान उघाडणी केली होती. त्यानंतर शिंदे यांनी तातडीने दिल्ली गाठली. दरम्यान या भेटीनंतर एकनाथ शिंदे यांनी ही भेट बिहारमधील एनडीएच्या विजया निमित्त अभिनंदन करण्यासाठी होती असं स्पष्ट केलं. आपण कुणाचीही तक्रार करण्यासाठी दिल्लीत आलो नव्हतो. तक्रारीचा पाढा रडणारा एकनाथ शिंदे नाही. आम्ही तक्रारी राष्ट्रीय पातळीवर आणत नाही. जो विषय आहे तो स्थानिक पातळीवरचा आहे असं ही ते म्हणाले. आम्ही स्थानिक निवडणुकीही युती म्हणूनच लढणार आहोत असं ते यावेळी म्हणाले.