रामराजे शिंदे, प्रतिनिधी
राज्याला गुरुवारी (5 डिसेंबर 2024) नवा मुख्यमंत्री मिळणार आहे. मुंबईतील आझाद मैदानात होणाऱ्या कार्यक्रमात नवे मुख्यमंत्री शपथ घेतील. हा मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचा असेल, हे आता स्पष्ट झालंय. त्याचबरोबर मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर दोन उपमुख्यमंत्री असतील. महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार उपमुख्यमंत्री होणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे. पण, शिवसेनेचा उपमुख्यमंत्री कोण होणार? हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
शिवसेना खासदार रिंगणात
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होणार का? हा प्रश्न अद्याप कायम आहे. शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार का? शिंदेंनी नकार दिला तर त्यांच्या पक्षातील कोणत्या नेत्याच्या गळ्यात या पदाची माळ पडणार? हे प्रश्न सध्या चर्चेत आहेत. त्याचवेळी शिवसेना खासदारांनी एकनाथ शिंदेंकडं आग्रही मागणी केली आहे.
एकनाथ शिंदे यांनी मंत्रीमंडळात सहभागी व्हावं, असं मत शिवसेना खासदारांनी व्यक्त केलं आहे. शिंदे मंत्रीमंडळात सहभागी झाले नाही तर काय परिणाम होतील याची त्यांनी कल्पना दिली आहे. शिंदे यांनी महत्त्वाची खाती दुसऱ्या मंत्र्यांना देऊ नयेत. 'मी तुमच्या जागी असतो तर मी ही मंत्रीमंडळात सहभागी झालो असतो ' असं एका शिवसेना खासदारानं सांगितलं.
( नक्की वाचा : महायुतीच्या नेत्यांना मंत्री होण्यासाठी द्यावी लागेल अमित शाहांची टेस्ट, वाचा काय असतील प्रश्न )
मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांचा प्रशासनावर वचक निर्माण झाला आहे. तसा वचक दुसरा कोणाचाही नसेल, त्यामुळे शिंदे यांनी सरकारमध्ये सहभागी व्हायला पाहिजे, असं मत शिवसेना खासदारांनी व्यक्त केलंय.
का आहे तिढा?
कनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडल्यानंतर दुसऱ्या सन्मानजनक खात्यांची मागणी केली आहे. यामध्ये गृहमंत्रीपदासाठी ते आग्रही असल्याचे समोर आले होते. उपमुख्यमंत्रीपद न देता गृहमंत्रीपद द्यावे, अशी एकनाथ शिंदे यांची मागणी आहे. मात्र त्यांची ही मागणी भाजपने फेटाळल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले आहे.
भाजपकडून एकनाथ शिंदे यांना गृह मंत्रालय तसेच उर्जा खाते देण्यास विरोध असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे. एकनाथ शिंदे हे गृहमंत्री, उर्जामंत्री तसेच जलसंपदा खाते यासाठी आग्रही आहेत मात्र त्यांना गृह मंत्रालय मिळणार नाही, असा थेट संदेश भाजपकडून देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
भाजपातील संकटमोचक अशी ओळख असलेल्या गिरीश महाजन यांनी एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.