राहुल कांबळे, प्रतिनिधी
Navi Mumbai Crime : नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. एकनाथ शिंदे गट विरुद्ध गणेश नाईक गट अशी थेट लढत रंगताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून या दोन्ही गटात आरोप-प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी झडत आहेत. निवडणुकीच्या तोंडावर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मतदानाला फक्त तीन दिवस उरले असतानाच नवी मुंबईतील राजकीय वादविवादाचे तीव्र पडसाद उमटत असल्याचं पाहायला मिळत आहे. कोपरखैरणे परिसरात निवडणूक प्रचारादरम्यान वादाची घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.
'निवडणूक आयोगाकडे तक्रार का केली नाही?'
प्रभाग क्रमांक 11 मधील भाजपचे अधिकृत उमेदवार संदीप म्हात्रे आणि किशोर पाटील यांनी शिवसेनेचे कार्यकर्ते उमेश पाटील यांना पैसे वाटपाच्या संशयावरून मारहाण केली,असा आरोप आहे.परंतु, उमेश पाटील यांनी हे आरोप फेटाळले आहेत. “हे पैसे माझे स्वतःचे आहेत. मी कुठल्याही प्रकारचे पैसे वाटप करत नव्हतो,”असं त्यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात उमेश पाटील यांचा एक व्हिडिओही समोर आला आहे. यात ते म्हणतात की,“जर मी पैसे वाटत होतो,तर मला पोलीस ठाण्यात नेऊन तक्रार का करण्यात आली नाही? तसेच निवडणूक आयोगाकडे तक्रार का करण्यात आली नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
नक्की वाचा >> Pune News: राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या घरात घुसून भाजप कार्यकर्त्यांचा राडा, महिला डॉक्टरचा केला विनयभंग!
निवडणूक अधिकाऱ्यांकडून कोणतीही कारवाई नाही
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित सर्वजण एकाच गावातील असल्यामुळे हा वाद आपापसांत मिटवण्यात आला.त्यामुळे या प्रकरणी पोलिसांकडे कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. तसेच निवडणूक अधिकाऱ्यांकडूनही याबाबत कोणतीही अधिकृत कारवाई करण्यात आलेली नसल्याचे समजते. एकीकडे राज्यस्तरीय नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध रंगले असताना दुसरीकडे स्थानिक पातळीवरील अशा घटनांमुळे निवडणूक काळातील तणाव अधिकच वाढत असल्याचे चित्र नवी मुंबईत पाहायला मिळत आहे.आगामी काळात आणखी कोणती राजकीय समीकरणे बदलतात,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.