विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्वच इच्छुक उमेदवार चाचपणी करत आहेत. त्यामुळे जिकडे संधी तिकडे जाण्याचा त्यांचा मानस आहे. मोहोळ मतदार संघातही सध्या तिच स्थिती दिसत आहे. या मतदार संघातून पुन्हा एकदा निवडणूक लढवण्यास माजी आमदार रमेश कदम इच्छुक आहे. रमेश कदम हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जात होते. मात्र कदम यांनी अजित पवारांपासून चार हात लांब राहाण्याचे ठरवले आहे. त्यांना आगामी विधानसभा निवडणूक शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून लढायची आहे. त्या दृष्टीने त्यांनी प्रयत्नही सुरू केले आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
रमेश कदम हे मोहोळ विधानसभेचे माजी आमदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून ते निवडून आले होते. आघाडीचे सरकार असताना त्यांची नियुक्ती आणाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळावर करण्यात आली होती. अजित पवारांच्या शिफारशीवरून ही नियुक्ती केली गेली होती. कदम हे अजित पवारांचे समर्थक म्हणून ओळखले जात होते. मात्रनंतरच्या काळात कदम यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. आरोपानंतर कदम यांना जेलवारी करावी लागली. त्यामुळे अजित पवार आणि कदम यांच्यातले अंतर वाढत गेले.
आत रमेश कदम हे जेल बाहेर आहेत. त्यांना आता विधानसभा निवडणूक लढवायची आहे. त्यांनी आपली ही इच्छा बोलून दाखवली आहे. कार्यकर्त्यांनी आपण निवडणूक लढावी असा आग्रह केला आहे असे कदम म्हणाले. शिवाय शरद पवारांच्या राष्ट्रवादी कडून उमेदवारी मिळावी अशी मागणी ही कार्यकर्त्यांची आहे. त्यामुळे शरद पवारांच्या पक्षाकडे उमेदवारी मागणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ताकाला जाऊन भांडं लपवणार नाही असं सांगत, आपण शरद पवारांकडून निवडणूक लढवणार असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान मोहोळ विधानसभेचे विद्यमान आमदार यशवंत माने हे अजित पवारां बरोबर आहेत. त्यांच्या विरोधात रमेश कदम हे मैदानात उतरण्याची शक्यता आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत रमेश कदम यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी नाकारली होती. त्यामुळे त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. त्यात त्यांना जवळपास 23 हजाराच्या आसपास मते मिळाली होती. ते तिसऱ्या क्रमांकावर राहीले होते. त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र आता त्यांना पुर्ण ताकदीने मैदानात उतरण्याचा निश्चय केला आहे.