अभिषेक अवस्थी
एकाच दिवशी एकाच पदासाठी दोन आदेश आणि दोन्ही अधिकाऱ्यांना अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. त्यामुळे महायुती सरकारमध्ये नक्की काय चाललं आहे याची चर्चा चांगलीच रंगली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सामान्य प्रशासन विभाग आहे. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास विभाग आहे. परंतु या दोन्ही विभागांनी एकाच पदासाठी दोन वेगवेगळे आदेश काढले आहेत. विशेष म्हणजे हे दोन्ही आदेश एकाच दिवशी काढले आहे. त्यामुळे राज्य सरकारची मात्र अडचण झाली आहे. अशा वेळी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात कोल्डवॉर सुरू आहे का अशी चर्चा मंत्रालयात रंगली आहे.
बेस्ट महाव्यवस्थापक पदावरून श्रीनिवास हे सेना निवृत्त झाले. त्यामुळे हे पद रिक्त होते. त्यामुळे यापदावर अतिरिक्त कार्यभार दोन अधिकाऱ्यांना दिल्याने गोंधळ निर्माण झाला आहे. नगरविकास विभागाने बेस्ट महाव्यवस्थापक पदाचा अतिरीक्त भार अश्विनी जोशी यांना दिला. तसा आदेशही आढण्यात आला. त्याच वेळी मुख्यमंत्र्यांकडे असलेल्या सामान्य प्रशासन विभागाने आशीष शर्मा यांना या पदाचा अतिरिक्त पदभार दिला. त्याबाबत आदेशही काढण्यात आला. हे दोन्ही आदेश एकाच दिवशी काढण्यात आले हे विशेष.
आता एकाच दिवशी म्हणजे 5 ऑगस्टला दोन अधिकाऱ्यांना अतिरिक्त पदभार दिल्याने, कुणाच्या आदेशाचे पालन करायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये अधिकाऱ्यांच्या नियुक्तीवरून संघर्ष सुरू असल्याची चर्चा सुरू झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यात ही घटना घडल्यामुळे शिंदेंना शह देण्यासाठीच मुख्यमंत्र्यांनी ही नियुक्ती केली नाही ना असं ही बोललं जात आहे.
नक्की वाचा - Pratap Sarnaik : ओला, उबर, रॅपिडोला जबरा पर्याय! आता एसटी महामंडळाचे 'छावा राइड' ॲप
हे सर्व प्रकार होत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुंबई आणि दिल्लीमधील वाढत्या भेटीगाठींमुळे या चर्चांना आणखी बळ मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर, पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील अंतर्गत कलह उघडपणे समोर आला आहे. कारण एकाच दिवशी एकाच पदासाठी दोन आदेश आणि दोन्ही अधिकाऱ्यांना अतिरिक्त पदभार देण्यात आल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.त्यात आता एकनाथ शिंदे हे दिल्लीत आहेत. त्यांना अमित शहा यांचीही भेट घेतली आहे.