
शुभम बायस्कार, प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून महायुतीवर चांगलेच नाराज असलेले अमरावतीचे माजी खासदार आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आनंदराव अडसुळांचे अखेर पुनर्वसन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. पण, आनंदरावांना मोठी जबाबदारी मिळाल्यानं त्यांचा मुलगा अभिजीत अडसूळ यांच्यावर अन्याय होणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाल्या आहेत.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय घडलं?
अमरावतीचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी काही दिवसापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्याला राज्यपालपदाचे आश्वासन दिले होते, असा दावा केला होता. तर, त्यांचे पुत्र माजी आमदार कॅप्टन अभिजीत अडसूळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आनंदराव अडसूळ यांचे नाव राज्यपाल पदासाठी संयुक्त पत्राद्वारे पाठवल्याची माहिती दिली होती. केंद्रीय गृहमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला नसल्याची खंत कॅप्टन अभिजीत अडसूळ यांनी व्यक्त केली होती.
आनंद अडसूळ यांच्यासोबत योग्य न्याय न झाल्यास पंधरा दिवसात आपण वेगळा निर्णय घेऊ, असा इशारा देखील त्यांनी दिला होता. मात्र, देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर आक्रमक झालेले कॅप्टन हे पुढे शांत राहिल्याचे सांगितलं जातंय. आनंदराव अडसूळ हे अमरावतीचे माजी खासदार आहेत. 2019 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी समर्थित उमेदवार नवनीत राणा यांनी त्यांचा पराभव केला होता.
( नक्की वाचा : नितीन गडकरींच्या वाहनाचे स्टेअरिंग भाजपाच्या जुन्या नेत्याच्या हाती, विदर्भात चर्चांना उधाण )
नवनीत राणा यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे शिवसेनेचा बालेकिल्ला असणारी अमरावती लोकसभेची जागा ही भाजपला सुटली आणि उमेदवारीची माळ नवनीत राणा यांच्या गळ्यात पडल्याने अडसूळ यांना गेल्या लोकसभा निवडणुकीत माघार घेण्यास सांगितलं गेलं. त्यावेळी वरिष्ठांकडून आपल्याला राज्यपाल पदाचा शब्द देण्यात आल्याचा दावा अडसुळांकडून करण्यात आला होता. मात्र लोकसभेत नवनीत राणा यांचा पराभव झाल्याने अडसुळांच्या राज्यपाल पदाचे स्वप्न हे धूसर झाले. तर बडनेराचे आमदार रवी राणा यांनी राज्यपाल पदाच्या शब्दावरून अडसूळ हे भाजपला ब्लॅकमेल करत असल्याचा हल्लाबोल चढवला होता.
आनंदरावांचं पुनर्वसन
राज्यपाल पदाचा शब्द देऊन लोकसभेत शांत करणाऱ्या अडसुळांची आगामी विधानसभेत अडचण होऊ नये म्हणून की काय विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीच माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचे महायुतीकडून पुनर्वसन करण्यात आल्याचे सांगितलं जातंय. आनंदराव अडसूळ यांची नेमणूक राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या अध्यक्षपदी करण्यात आली आहे. अडसूळ यांनी पुत्र कॅप्टन यांच्यासाठी दर्यापूरच्या विधानसभेच्या जागेची मागणी वरिष्ठांकडे केल्याचे समजते.
( नक्की वाचा : 'राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाखांचं बक्षीस', शिवसेना आमदाराचं खळबळजनक वक्तव्य )
काही दिवसापूर्वी महायुतीची दर्यापूर विधानसभेची जागा कॅप्टन अभिजीत अडसूळ यांना सुटल्यात जमा असल्याचे देखील विधान त्यांनी केलं होतं. मात्र त्यापूर्वीच अडसूळ यांना राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या अध्यक्षपदी नेमून महायुतीकडून सूचक संकेत दिल्याचे समजते. त्यामुळे दर्यापूरच्या विधानसभेच्या जागेवरील अडसुळाना आता दावा सोडावा लागणार अशा चर्चा अमरावती जिल्ह्यात सुरू झाल्या आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world