- गोधराच्या नगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक सातमध्ये अपक्ष हिंदू उमेदवार अपेक्षाबेन नैनेशभाई सोनी या विजयी झाल्या
- या वॉर्डमध्ये मतदारसंख्या पूर्णपणे मुस्लिम आहे
- मुस्लिम मतदारांनी धार्मिक आणि जातीय चौकटी मोडून स्थानिक प्रश्नांवर लक्ष देणाऱ्या उमेदवाराला प्राधान्य दिले आहे
Godhra Municipality Result: सांप्रदायिक इतिहासामुळे नेहमीच चर्चेत राहणाऱ्या गोधरा शहराने 2026 च्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत सामाजिक सलोख्याचा एक मोठा संदेश दिला आहे. गोधरा नगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक 7 मधून अपक्ष उमेदवार अपेक्षाबेन नैनेशभाई सोनी यांनी ऐतिहासिक विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे, या वॉर्डातील मतदार 100% मुस्लिम आहेत. असं असतानाही तिथून एका हिंदू महिलेने बाजी मारली आहे. त्यामुळे या निकालाने सर्वच जण हैराण झाले आहे. त्यामुळे या निकालाची चर्चा संपूर्ण गुजरातमध्ये रंगली आहे.
अपेक्षाबेन सोनी यांचा हा विजय सध्या संपूर्ण गुजरातमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. या वॉर्डात त्या स्वतः मतदार म्हणून नोंदणीकृत नसतानाही त्यांनी स्थानिक लोकांचा विश्वास संपादन केला. राजकीय विश्लेषकांच्या मते, मुस्लिम मतदारांनी पारंपारिक धार्मिक आणि जातीय चौकटी मोडून विकासाच्या मुद्द्यावर अपेक्षाबेन यांना मतदान केले. स्थानिक प्रश्नांची जाण असलेला योग्य उमेदवार निवडण्यासाठी मतदारांनी दिलेला हा कौल अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. या निकालाने राजकीय समिकरणं बदलत चालली आहेत का अशी ही चर्चा रंगली आहे.
गोधराच्या राजकीय इतिहासात या निकालाला मैलाचा दगड मानले जात आहे. पूर्णपणे मुस्लिम लोकसंख्या असलेल्या प्रभागात एका हिंदू महिलेला मोठ्या बहुमताने निवडून देऊन मतदारांनी सामाजिक ऐक्याचे दर्शन घडवले आहे. हा निकाल केवळ एका जागेचा विजय नसून, तो समाजातील विभाजनापेक्षा कार्यक्षमता आणि विश्वासाला प्राधान्य देणारा कौल आहे. भविष्यात गुजरातच्या ग्रामीण आणि निमशहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत हा 'गोधरा पॅटर्न' मोठे बदल घडवून आणण्याचे संकेत देत आहे.
प्रत्येक पक्षाची वोट बँक असते. त्यामुळे त्या त्या मतदार संघात कोणाचे प्राबल्य असेल हे डोळे झाकून सांगितले जाते. शिवाय तिथून कोण विजयी होईल याचा आधीच अंदाज बांधला जातो. मुस्लीम, दलित, आदिवासी बहुल भाग कोणाच्या बाजूने जाणार हे आधीच ठरलं असतं. हिंदू मतदार काय करणार याबाबत ही प्रत्येकाचे अंदाज असतात. हे अंदाज काही अंशी खरे ही ठरतात. पण सर्वांचेच अंदाज चूकवणारा निकाल गुजरातच्या गोधरा मधून सर्वां समोर आला आहे. त्यामुळे स्थानिक निवडणुकीत सर्वच समिकरणं ही वेगळी असतात हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world