राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या स्पष्ट बोलण्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. कधी ते कार्यकर्त्यांना झापताना दिसतात तर कधी अधिकाऱ्यांवर दरडावतात. ते ही सर्वां समोर. त्यात कुठलाही आडपडदा नसतो. त्याचा अनुभव अनेक वेळा आला आहे. आता अजित पवार हे बीडचेही पालकमंत्री आहेत. ते बीड दौऱ्यावर आहेत. त्यावेळी असाच एक अनुभव कार्यकर्त्यांना आला. त्यांनी थेट जाहीर कार्यक्रमात आपल्या कार्यकर्त्यांना झापलं. शिवाय चुकीचं वागला तर थेट मकोका लावू असं सांगितलं. विशेष म्हणजे त्यावेळी धनंजय मुंडेही व्यासपीठावर उपस्थित होते.
ऊसतोड कामगारांच्या मेळावा बीड इथं होता. त्याला अजित पवारांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी चुकीचं वागणाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत. जर कोणी चुकीचे वागत असेल आणि कायदा हातात घेत असेल तर त्यांना शासन झालं पाहिजे. मधल्या काळामध्ये जिल्ह्याची बदनामी झाली आहे. मात्र यापुढे ते खपवून घेतलं जाणार नाही. जो चुकीचं वागेल त्याला मकोका लावू. त्यानंतर मग चक्की पीसिंग अँड पिसिंग अँड पिसिंग असा डायलॉगही त्यांनी मारला.
नक्की वाचा - Pratap Sarnaik : ओला, उबर, रॅपिडोला जबरा पर्याय! आता एसटी महामंडळाचे 'छावा राइड' ॲप
थेट जेलमध्ये घालू. माझ्यासकट कायदा सर्वांना समान आहे. तो कोणत्या पक्षाचा आहे. कोणत्या जाती धर्माचा आहे. हे न पाहता त्याच्यावरती कार्यवाही केली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान आणि त्याच संविधानाप्रमाणे कार्यवाही होईल. कोणीही चुकीचे वागू नका. चुकीचं वागणारांना सांगा की पालकमंत्र्यांनी सांगितलं आहे. यापुढे कोणाचीही गय केली जाणार नाही असे खडे बोल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुनावले.
नक्की वाचा - Pune News: पुणे महापालिकेत मनसेचा जोरदार राडा, नक्की काय घडलं?
कोण मोठा, कोण छोटा हे न पाहता कार्यवाही झाली पाहिजे असे देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं. बीड जिल्हा हा संतोष देशमुख हत्येनंतर चर्चेत आला. अनेक प्रकरणे समोर आली. शिवाय राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर गंभीर आरोप झाले. त्यात वाल्मिक कराड याला जेलमध्ये जावे लागले. तर धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला. त्यात आता अजित पवारांनी इशारा दिला आहे. विशेष म्हणजे त्यावेळी धनंजय मुंडेही व्यासपीठावर उपस्थित होते. त्यामुळे कही पे निगाहे कही पे निशाना अशी चर्चा बीडमध्ये सुरू आहे.