भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने पाकिस्तानचे कंबरडे मोडले आहे. चार दिवस चाललेल्या लष्करी कारवाईत भारताने पाकिस्तानला गुडघ्यावर आणले आहे. देशातील प्रत्येक नागरिकाने सरकारच्या या लष्करी कारवाईचे कौतुक केले आहे. विरोधी पक्षांनीही मोदी सरकारला पूर्ण पाठिंबा दिला आहे. आता काँग्रेस नेते राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून पहलगाम दहशतवादी हल्ला, 'ऑपरेशन सिंदूर' आणि शस्त्रसंधी घोषणेवर चर्चा करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन तातडीने बोलावण्याची मागणी केली आहे. जेणेकरून भारतीय लष्कराने पाकिस्तानला किती खोलवर जखम दिली आहे, हे देशातील जनतेला समजू शकेल.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आपल्या पत्रात लिहिले आहे की "विरोधी पक्षांनी एकमताने केलेल्या विनंतीचा मी पुनरुच्चार करतो की, संसदेचे विशेष अधिवेशन तातडीने बोलावण्यात यावे. पहलगाम दहशतवादी हल्ला, 'ऑपरेशन सिंदूर' आणि आजच्या शस्त्रसंधीवर चर्चा करणे लोकांसाठी आणि त्यांच्या प्रतिनिधींसाठी खूप महत्त्वाचे आहे, शस्त्रसंधीची घोषणा सर्वप्रथम अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केली होती. येणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही आमच्या या मागणीचा गांभीर्याने आणि तत्परतेने विचार कराल. असं राहुल गांधी यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.
ट्रेंडिंग बातमी - India Pakistan Tension : ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरूच; भारतीय हवाई दलाचं सूचक ट्वीट
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी 28 एप्रिलच्या आपल्या पत्राचा उल्लेख केला, ज्यात त्यांनी पंतप्रधान मोदींना पहलगाम दहशतवादी हल्ल्यावरील चर्चेसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची विनंती केली होती. खर्गे यांनी आपल्या पत्रात लिहिले आहे, "माननीय पंतप्रधानजी, कृपया लक्षात ठेवा की, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून मी तुम्हाला काय सांगितले होते. मी 28 एप्रिल रोजी लिहिलेल्या पत्राद्वारे पहलगाममध्ये झालेल्या अमानुष दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संसदेच्या दोन्ही सभागृहांचे विशेष अधिवेशन बोलावण्याची विनंती केली होती.
ताज्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर लोकसभेतील विरोधी पक्षनेत्यांनी तुम्हाला पुन्हा पत्र लिहून सर्व विरोधी पक्षांच्या एकमताने केलेल्या विनंतीची माहिती दिली आहे. त्यांनी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची विनंती केली आहे, ज्यात पहलगाम दहशतवाद, 'ऑपरेशन सिंदूर' आणि वॉशिंग्टन डीसीमध्ये आणि नंतर भारत आणि पाकिस्तान सरकारांनी केलेल्या शस्त्रसंधी घोषणांवर चर्चा करण्याचा विषय आहे. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून मी या विनंतीच्या समर्थनार्थ पत्र लिहित आहे. मला विश्वास आहे की, यासाठी तुम्ही सहमत व्हाल."
राज्यसभा खासदार कपिल सिब्बल यांनी माध्यमांशी बोलताना संसदेचे विशेष अधिवेशन आणि सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची विनंती केली. ते म्हणाले, आज आम्ही कोणतीही टीका करणार नाही. त्यांनी सर्व राजकीय पक्षांना आवाहन केले की, जोपर्यंत सरकार त्यांना हे आश्वासन देत नाही की, पंतप्रधानही बैठकीला उपस्थित राहतील, तोपर्यंत त्यांनी बैठकीत सहभागी होऊ नये. त्यामुळे आता विशेष अधिवेशना बाबत सरकार काय निर्णय घेतं याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.