Kalyan Congress : डोंबिवलीतील काँग्रेसच्या चार माजी नगरसेवकांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि प्रदेश प्रतिनिधी संतोष केणे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. 'जे लोक पक्ष सोडून गेले. त्याबाबत प्रदेशाध्यक्ष सपकाळ साहेबांना बाेलण्याचा प्रयत्न केला, पण काँग्रेसमध्ये कार्यकर्त्यांचे खच्चीकरण चालू आहे. आज पक्षाची जी परिस्थिती झाली. ही परिस्थितीत कल्याणमधील एका डायनसोरने करुन ठेवली आहे. आज व्होट चोरीचा मुद्दा उचलला जात आहे. सदस्य चाेरी देखील पक्षात सुरु आहे, अशी घणाघाती टिका काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी संतोष केणे यांनी नाव न घेता काँग्रेस नेते संजय दत्त यांच्यावर केली आहे.
काय घडलं?
डाेंबिवली माजी चार नगरसेवक पक्षाला सोडून आज भाजपमध्ये गेले. त्यांचा पक्ष प्रवेश झाला आहे.त्यानंतर डोंबिवलीतील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि प्रदेश प्रतिनिधी संतोष केणे यांनी हा आरोप केला आहे.
जे नगरसेवक भाजपमध्ये गेले आहेत. त्याबाबत त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. पक्षात कार्यकर्त्यांचे खच्चीकरण सुरु आहे. कार्यकर्त्यांना कोणी विचारत नाही. फक्त आपल्या लोकांना पदावर बसविले जात आहे. आज जी काँग्रेसची परिस्थिती झाली आहे. त्या परिस्थितीसाठी कल्याणमधील एक नेता जबाबदार आहे. पक्षातील हा डायनासाेरमध्ये पक्षाची आज ही परिस्थिती झाली आहे.
( नक्की वाचा : Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांची RSS बैठकीत उपस्थिती, दिल्ली ते मुंबई एका फोटोने राजकारण तापले ! )
ऑल इंडिया कमिटीच्या आठ सदस्यांच्या निवडणूकीसाठी प्रक्रिया केली जाते. ही निवडणूक प्रक्रिया पार पडल्यावर हा नेता दिल्लीत जाऊन बसतो. पक्षात काय सुरु आहे. ते बघत सुद्धा नाही. जुने आणि भूमीपत्र नेत्यांना पक्षात आज स्थान नाही. व्होट चोरीचा आरोप सध्या केला जातोय, इथे तर पक्ष चोरी सुरु आहे असा माझा आरोप आहे. सदस्य नोंदणीच्या दरम्यान बाकीच्या लोकांना बाजूला ठेवून आपल्या मताचे सदस्य ते त्यांच्यावर निवडून आणतात. आपली पोळी भाजून घेतात, असा दावा केणे यांनी केला.
ज्यांना तीन वेळा पक्षानं आमदारकी दिली त्यांनी पक्षाचं काम केलं पाहिजे. पण, प्रत्यक्षात कल्याणचे पक्ष कार्यालय तोडले आहे. पक्ष कार्यालयासाठी विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना मी 20 लाखांचा निधी दिला. ते पैसे देखील खाऊन टाकले, असा आरोप केणे यांनी केला.
जिल्हाध्यक्षांनी दिलं आव्हान
संतोष केणे यांच्या आरोपाचे पडसाद कल्याण काँग्रेसमध्ये उमटत आहेत. 'संतोष केणे यांनी पक्षासाठी काही कामे केली असतील दाखवा ,मी राजकारण सोडेन,' असं आव्हान जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी 'NDTV मराठी' सोबत बोलताना दिले आहेत.
ते 25 वर्षांपासून काँग्रेस पक्षाचे काम करतात. ते स्वत:ला पक्षाचे ज्येष्ठ नेते समजतात. त्यांना एकदा नगरसेवक होण्याची संधी मिळाली होती. त्यानंतर ते कुठल्याही नगरसेवक निवडणुकीत निवडून आले नाहीत. याचा अर्थ त्यांचे काम नाही. त्यांना विधानसभेची उमेदवारी दिली होती. त्याचे डिपॉझिट जप्त झाले. त्यांनी आरोप केलेले 20 लाख रुपये कुठून आणि कधी दिले? हे सिद्ध करावे. पक्षाचे डोंबिवलीतील कार्यालय बिल्डरच्या संगनमताने गिळून टाकले. डोंबिवलीमध्ये 15 वर्षात संतोष केणे यांनी पक्षाचा एकही कार्यक्रम केला असेल तर मी राजकारण सोडेन असे आव्हान पोटे यांनी दिले आहे.