जाहिरात

Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांची RSS बैठकीत उपस्थिती, दिल्ली ते मुंबई एका फोटोने राजकारण तापले !

Sunetra Pawar : अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रनौत यांच्या दिल्लीतील घरात झालेल्या एका बैठकीने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांची RSS बैठकीत उपस्थिती, दिल्ली ते मुंबई एका फोटोने राजकारण तापले !
Sunetra Pawar : सुनेत्रा पवार नेमक्या कशासाठी या बैठकीत होत्या, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मुंबई:

Sunetra Pawar : अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रनौत यांच्या दिल्लीतील घरात झालेल्या एका बैठकीने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. . महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी आणि राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार या राष्ट्रसेविका समितीच्या (RSS ची महिला शाखा) बैठकीत दिसल्याने राजकीय वर्तुळात नवी चर्चा सुरु झाली. 

भगवा ध्वज, डॉ. हेडगेवार, गोळवलकर गुरुजी आणि भारतमातेच्या तसबिरी असलेल्या वातावरणात सुनेत्रा पवारांची उपस्थिती अनेकांना आश्चर्यचकित करणारी ठरली. कारण, यापूर्वी अजित पवार किंवा त्यांच्या गटातील कोणत्याही आमदार-खासदारांनी RSS च्या कार्यक्रमांना हजेरी लावलेली नाही. त्यामुळे सुनेत्रा पवार नेमक्या कशासाठी या बैठकीत होत्या, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Latest and Breaking News on NDTV

या घटनेनंतर शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने यावर जोरदार टीका केली आहे. 'एकीकडे स्वतःला पुरोगामी म्हणायचे आणि दुसरीकडे RSS च्या बैठकांना उपस्थिती दर्शवायची, हा दुटप्पीपणा आहे,' असा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे.

या संदर्भात अजित पवारांना विचारले असता, त्यांनी यावर अधिक बोलणे टाळले. 'बायको मिनिटा मिनिटाला कुठे जाते, ते मी विचारत नाही,' असे त्यांनी स्पष्ट केले.

( नक्की वाचा : Delhi CM Attack : 'भैरव देवानेच दिला होता आदेश', मुख्यमंत्र्यांवर हल्ला करणाऱ्याचा अजब दावा ! )
 

सुनेत्रा पवारांनी काय सांगितलं?

दरम्यान, सुनेत्रा पवार यांनी या भेटीबाबत स्पष्टीकरण दिले आहे. 'कंगना रनौत यांना केवळ भेटण्यासाठी आणि शुभेच्छा देण्यासाठी त्या गेल्या होत्या. तिथे राष्ट्रसेविका समितीची बैठक आहे, याची त्यांना कल्पना नव्हती. तिथे इतर महिला खासदारही उपस्थित होत्या आणि कंगनाचे घर असल्याने त्या थोडा वेळ थांबल्या,' असे त्यांनी सांगितले.

हे प्रकरण तापल्यानंतर त्यांनी X वर ट्विट करत स्पष्टीकरण दिलं आहे. पवार यांनी ट्विटमध्ये सांगितलं की, 

एका मीटिंगमध्ये माझ्या उपस्थितीबाबत चर्चा सुरू आहे, ज्याबाबत मी स्पष्टीकरण देऊ इच्छिते की त्यामागे कोणताही राजकीय उद्देश्य नव्हता. यात इतर महिला खासदारही सहभागी होत्या. राज्यसभेच्या खासदार म्हणून आणि बारामतीमध्ये दीर्घकाळ सामाजिक कार्य करत असताना, मला विविध महिला संघटनांच्या कामाची प्रत्यक्ष ओळख करून घेण्याची उत्सुकता असते. त्या बैठकीत विविध राज्यांतील महिला सहभागी होत्या. त्यांचे उपक्रम आणि कार्यपद्धती समजून घेण्यासाठीच मी तिथे गेले होते. त्या वेळी मला बोलण्यास सांगितले, तर मी फक्त दोन शब्दात माझी भूमिका मांडली.

कृपया माझ्या या उपस्थितीचा राजकीय अर्थ काढू नये. समाजातील महिलांचे कार्य समजून घेणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे हाच माझा उद्देश होता, आहे आणि राहील.

परंतु, सुनेत्रा पवारांच्या स्पष्टीकरणानंतरही या भेटीची राजकीय चर्चा थांबलेली नाही. अजित पवारांच्या राष्ट्रवादीची ओळख सर्वधर्मसमभाव आणि सर्वसमावेशक अशी आहे. त्यातच, लोकसभा निवडणुकीत अजित पवारांना सोबत घेतल्याने भाजपचे नुकसान झाल्याचे बोलले जाते. अशा परिस्थितीत सुनेत्रा पवारांची RSS संबंधित कार्यक्रमातील उपस्थिती राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे. हिंदुत्वाचा शिक्का लागल्यास पक्षाच्या मूळ विचारधारेला आणि मतांना फटका बसू शकतो, याची जाणीव अजित पवारांना असल्याने ते यापासून शक्यतो दूर राहण्याचा प्रयत्न करत आहेत. आता सुनेत्रा पवारांच्या या उपस्थितीमुळे राजकीय समीकरणे काय बदलतात, हे पाहणे महत्त्वाचे असेल.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com