अमजद खान
प्रभाग रचना जाहिर झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीचे बिगूल वाजले आहे. यामध्ये केडीएमसीचा ही समावेश आहे. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांनी तयारी सुरु केली आहे. एकीकडे तयारी सुरु असताना दुसरीकडे गणेश उत्सवा दरम्यान नेत्यांच्या भेटीगाठी देखील सुरु आहेत. राजकारणातील कट्टर विरोध आज एकत्र दिसले. निमित्त होते गणेश दर्शनाचे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण गणेश दर्शनाकरीता शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांच्या घरी गेले होते. त्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे.
कल्याण डोंबिवली महापालिका प्रभाग रचना जाहीर झाली आहे. 4 सप्टेंबरपर्यंत प्रभाग रचनेवर हरकती सूचना घेण्याची अंतिम मुदत आहे. प्रभाग रचना जाहीर झाली. आता निवडणूका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांनी तयारी सुरु केली आहे. विशेष करुन सत्तेतील महायुतीचे दोन पक्ष शिवसेना शिंदे गट आणि भाजपने आपली संपूर्ण ताकद लावण्याची तयारी केली आहे. युती होणार की नाही हे अद्याप अस्पष्ट आहे. परंतू महापौर आपल्याच पक्षाचा असावा यासाठी दोन्ही पक्षांकडून जोर दिला जात आहे.
जास्तीत जास्त नगरसेवक निवडून येणार त्या पक्षाचा केडीएमसीच्या महापौरपदावर दावा राहणार आहे. यासाठी दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून माजी नगरसेवकांनी आपल्या पक्षात खेचण्याचे काम सुरु आहे. शिवसेना शिंदे गटात काही माजी नगरसेवकांनी प्रवेश केला. तर डोंबिवलीतील काँग्रेसचे काही माजी नगरसेवक भाजपमध्ये सामिल झाले. केडीएमसी निवडणूकीत भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि खासदार श्रीकांत शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे आणि मनसेचे नेते राजू पाटील यांना त्याच्यासाठी तितकीच ताकद लावावी लागणार आहे. कोण कोणत्या पक्षात जाणार याची चर्चा दबक्या आवाजात सुरु आहे.
अद्याप महायुतीतील पक्षांनी एकमेकांच्या नगरसेवकांची पळपळवी अद्याप केलेली नाही. मात्र पुढे होणार नाही याची शाश्वती देता येत नाही. सध्या गणेशोत्सव सुरु आहे. या उत्सवा दरम्यान नेते कार्यकर्ते, पदाधिकारी किंवा नगरसेवक एकमेकांच्या घरी जाऊन गणेश दर्शन घेत आहे. त्याचे राजकीय तर्कवितर्क काढले जात आहेत. त्यातच भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांच्या घरी जाऊन गणेश दर्शन घेतल्याने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. काही दिवसापूर्वी शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनीही म्हात्रे यांच्या घरी हजेरी लावली होती. त्यामुळे या भेटीगाठीतून काही वेगळेच समीकरण आखले जात आहे का याची चर्चा सुरू आहे.