संजय तिवारी, प्रतिनिधी
Kishor Tiwari Exclusive : गेली वर्षभर वेगवेगळ्या वृत्तवाहिनीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena UBT) पक्षाची खिंड लढवणाऱ्या किशोर तिवारी यांनी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. उबाठा शिवसेनेनं पक्ष प्रवक्ता पदावरून त्यांना मुक्त केलं आहे. त्यानंतर 'NDTV मराठी' ला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये तिवारी यांनी हे आरोप केले आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
विधानसभा निवडणुकीत तिकीटांची विक्री
किशोर तिवारी म्हणाले की, पक्षाला काही लोकांनी घेरले आहे पण उद्धव ठाकरे त्यांच्यावर कारवाई करत नाहीत. या नेत्यांना घरी बसवेपर्यंत पक्षाचं काही सांगता येत नाही. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या तिकिटांची विक्री झाली, असा थेट आरोप तिवारी यांनी केला. काही लोकांनी पक्षाच्या माध्यमातून संपत्ती गोळा केली आणि त्यांच्यामुळे पक्षाला मेगा गळती लागली आहे असा आरोप त्यांनी यावेळी केला.
राष्ट्रीय माध्यमांवर संजय राऊत यांच्या नॉटी या शब्दाचा वापर करीत केलेल्या विधानाचे समर्थन केल्याने नॉटी अंकल किंवा नॉटी चाचा असे टोपण नाव मिळालेल्या किशोर तिवारींनाच आता प्रवक्ते पदावरून मुक्त करण्यात आले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई केली आहे.
( नक्की वाचा : पहिली मशाल घेऊन मातोश्रीवर आलेल्या कार्यकर्त्याचा ठाकरेंना जय महाराष्ट्र! वाचा खळबळजनक पत्र )
फक्त 1 टक्के बोललो
मी आता एक टक्केच बोललो आहे, असा गर्भित इशाराही तिवारी यांनी या मुलाखतीमध्ये दिला. विधानसभा निवडणुकीत पक्षात तिकीट विक्री जोरात होती, पक्ष असा चालतो काय? असा सवाल त्यांनी विचारला. आमच्या पक्षात मोठे दारूवाले खासदार तर छोटे दारू विक्रेते आमदार अशी परिस्थिती आहे. पाच पक्ष फिरून आलेल्यांना तिकिटे वाटली. ते आमदार झाले, असं तिवारी म्हणाले.
सकाळचा भोंगा हवाच कशाला. निष्ठावान माणसे नाराज होऊन पक्ष सोडून जात असताना विष्ठा गेली हे कसे म्हणू शकता? असा सवाल तिवारी यांनी केला. संजय राऊत, विनायक राऊत, सुभाष देसाई, मिलिंद नार्वेकर यांची नावे घेत त्यांनी टीका केली.
( नक्की वाचा : EVM च्या मुद्यावर ठाकरेंमध्ये मतभेद, राज ठाकरेंच्या भूमिकेला मुलगा अमितकडूनच छेद )
उद्धव ठाकरे इनोसंट आहेत, पण ते घरी सुद्धा अडकले आहेत आणि पक्षात देखील कारवाई करू शकत नाहीत. मला पदमुक्त केलं आहे. पण पक्षातून काढेपर्यंत पक्षाचं काम करणार आहे. पक्षात माझ्यासारखा स्पष्टवक्ता निंदक नको झालाय. भाजपाला शिंगावर घेणारा शिलेदार काढत आहात आणि काहीच कसा फरक पडत नाही? असा सवाल त्यांनी यावेळी विचारला.