महायुतीचे टेन्शन वाढवणारी बातमी, आणखी एक मित्र पक्ष नाराज; 288 जागा लढवण्याचा निर्धार

महायुतीमध्ये सामील झालेले आमदार बच्चू कडू यांनी छत्रपती संभाजीराजे, शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्यासह मिळून तिसरी आघाडी स्थापन केली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

निनाद करमरकर

महाराष्ट्रामध्ये सत्ताधारी महायुती आघाडीमध्ये कुरबुरींना अधिक जोर चढू लागल्याचे चित्र दिसू लागले आहे. महायुतीमध्ये सामील झालेले आमदार बच्चू कडू यांनी छत्रपती संभाजीराजे, शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्यासह मिळून तिसरी आघाडी स्थापन केली आहे. या तिघांनी मिळून विदर्भ आणि मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी केली होती. बच्चू कडू यांच्यापाठोपाठ महायुतीमधील आणखी एका घटक पक्षाने महायुतीतून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे.  

हे ही वाचा : बारामतीत महायुतीमध्ये धुसफूस, शिवसेनेच्या नेत्याने अजित पवारांच्या फोटोवर टाकलं काळं कापड

लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर हे नाराज होते. परभणीतून उमेदवारी मिळावी यासाठी त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार) पक्षासोबत त्यांची बोलणीही झाली असल्याचे सांगितले जाते. मात्र महायुतीने त्यांची समजूत काढली आणि त्यांना परभणीतूनच उमेदवारी मिळाली. उमेदवारी मिळाली खरी मात्र जानकरांना या मतदारसंघातून विजय मिळवता आला नाही. विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना महादेव जानकरांनी नाराजीचे अस्त्र पुन्हा एकदा उपसले आहे. 

हे ही वाचा : मुलीला नदीत फेकून द्या म्हणणाऱ्या धर्मरावबाबा आत्राम यांच्या मुलीनं घेतला मोठा निर्णय

महादेव जानकरांनी आपली नाराजी बोलून दाखवताना म्हटले की, "रडल्याशिवाय आई सुद्धा दूध पाजत नाही. आपण किती दिवस एखाद्याच्या आश्रयाखाली राहायचं? त्यापेक्षा आपली आपली तयारी केली पाहिजे." जानकर पुढे म्हणाले की आम्ही महायुतीमध्ये आहोत की नाही हेच माहिती नसल्याने प्रत्येकाने आपली तयारी केली पाहिजे. पुढे ते म्हणाले की राष्ट्रीय समाज पक्ष आगामी विधानसभा निवडणुकीत 288 जागा लढवणार आहे. 

चुकीचा राजकीय इव्हेंट करू नये

नागपूरमध्ये हिट अँड रन प्रकरण घडले असून यामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत याचेही नाव पुढे आले आहे. या प्रकरणाबाबत विचारलं असता जानकर यांनी म्हटले की, त्याच्यावर एफआयआर झाला असून प्रत्येकाकडून चूक होत असते, मात्र त्याचा पॉलिटिकल इव्हेंट करणं योग्य नाही. जानकर पुढे म्हणाले की, याचा अर्थ असा होत नाही की मी बावनकुळे यांची बाजू घेतोय, उद्या उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्याही घरात काही घटना घडली, तर त्यावेळी सुद्धा माझी हीच भूमिका असेल. 

Advertisement