राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सोमवारी (18 नोव्हेंबर) अज्ञातांनी हल्ला केला होता. नागपूरमधील काटोल विधानसभा मतदारसंघात सोमवारी देशमुख यांच्या कारवर दगडफेक झाली. त्यामध्ये देशमुख यांच्या डोक्याला दुखापत झाल्यानं त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. देशमुखांना आज (मंगळवार, 19 नोव्हेंबर) हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. हॉस्पिटलमधून बाहेर पडल्यानंतर पत्रकारांशी बोलताना देशमुख यांनी भाजपाला इशारा दिला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाले देशमुख?
'मी भाजपाला इतकं सांगतो की, मला दगड मारा किंवा गोळी मारा अनिल देशमुख मरणार नाही. तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय आम्ही थांबणार नाही'. असा इशारा देशमुख यांनी हॉस्पिटलमधून बाहेर पडल्यानंतर पत्रकारांशी बोलताना भाजपाला दिला.
देशमुख यांना सोमवारी रात्री मॅक्स रुग्णालय दाखल करण्यात आलं. न्यूरोसर्जन डॉ.आदित्य अटल यांनी त्यांची तपासणी केली. तसेच मेंदूचे सिटीस्कॅनमध्ये परिणाम सामान्य आले आहेत. शिवाय त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं मेडिकल बुलेटिनमधून सांगण्यात आले. रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं त्यावेळी त्यांच्या कपाळावर जखम होती. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती डॉक्टरांनी दिली होती. त्यानंतर देशमुख यांना डिस्चार्ज दिला आहे.
( नक्की वाचा : Exclusive : अनिल देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, फडणवीसांना इशारा, Video )
भाजपाचा पलटवार
अनिल देशमुख आणि त्यांच्या पक्षानं केलेल्या आरोपांना भाजपाकडून चोख उत्तर देण्यात आलं आहे. भाजपा आमदार चित्रा वाघ यांनी या प्रकरणात काही फोटो ट्विट करत देशमुखांवर पलटवार केला आहे.हा फोटो काळजीपूर्वक पाहा..बोनेटवर दगड आहे. बोनेटला काहीच झालेले नाही. अनिल देशमुख यांनाही कुठली जखम नाही.एक व्यक्ती फोटो काढत आहे, झूम केल्यास तो आरशात दिसेल.
मला काहीही म्हणायचे नाही. समझनेवाले समझ गए ! असं ट्विट वाघ यांनी केलं आहे.