
अजित पवारांनी अर्थ संकल्प सादर केल्यानंतर विरोधक त्यांच्यावर तुटून पडले आहे. निवडणूक काळात महायुतीने जनतेला भरमसाट अश्वासनं दिली होती. त्यातील किती आश्वासनं पहिल्या अर्थसंकल्पात पूर्ण होतात याकडे सर्वांचे लक्ष्य लागले होते. त्यावरून आता उद्धव ठाकरे यांनी सरकारची कोंडी केली आहे. माझ्या थापा भारी आणि महाराष्ट्र केला कर्जबाजारी अशा शब्दात त्यांनी या अर्थ संकल्पावर टीका केली आहे. महायुतीने दहा महत्वाची आश्वासनं दिली होती. त्या पैकी एक तर त्यांनी पूर्ण केलं का? असा प्रश्न त्यांनी या निमित्ताने उपस्थित केला. शिवाय या अर्थसंकल्पाचा फोल पण दाखवण्याचा प्रयत्न ही केला.
'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
लाडक्या बहिणींना 2100 देण्याचे आश्वासन या सरकारने दिले होते. ते देण्यात आले का? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. जर दिले नाहीत तर आश्वासन कशाला दिले? मतं घेतली पण बहिणींना काहीच दिले नाही. शेतकऱ्यांना कर्ज माफी देण्याची घोषणा केली होती. ती केली का? असा प्रश्नही त्यांनी केला. काही कारण नसताना मुख्यमंत्र्यांनी माझं नाव घेतलं असतं. स्थगिती द्यायला मी काय उद्धव ठाकरे आहे का असं ते म्हणाले होते. त्यावर मी त्यांना सांगितलं होतं, तुम्हाला उद्धव ठाकरे कधीच होता येणार नाही.
उलट असं सांगितलं होतं की मी मुख्यमंत्री असताना पहिल्या अधिवेशनात शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलं होतं. तशी घोषणा तुम्ही करा. त्याची अंमलबजावणी करा. पण त्यांना तसं करता आलं नाही. त्यामुळे ते कधीच उद्धव ठाकरे होवू शकत नाहीत असंही ते म्हणाले. प्रत्येकाला अन्न निवारा देण्याचं आश्वासन होतं. त्याचं काय झालं. वृद्ध पेन्शनधारकांना 2100 रुपये कधी देणार? जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती कधी स्थिर करणार? या सारख्या असंख्य प्रश्नांची सरबत्ती त्यांनी केली. विद्यार्थ्यांना 10 हजार देणार होता, ते कधी देणार. अंगणवाडी सेविकांच्या मानधनाचं काय झालं अशी विचारणा ही त्यांनी केली.
या अर्थ संकल्पात सर्व सामान्यांसाठी काही नाही. पण ठेकेदारांसाठी भरभरून आहे, असं उद्धव म्हणाले. मुंबईत 64 हजार कोटींची विकास कामं केली जाणार आहेत. यातून कुणाचा विकास होणार आहे? यात फक्त ठेकेदारांचा आणि त्यांच्या मित्रांचा विकास होणार आहे असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. पुढचं पाठ आणि मागचं सपाट अशी स्थिती या सरकारची आहे. मोफत वीजेची घोषणा या सरकारने केली. पण मोफत पेक्षा चोवीस तास वीज द्या अशी मागणी त्यांनी केली. शेतकऱ्यांना आता वीजेची बीलं यायला लागली आहेत. थकबाकी दाखवली आहे. त्याचं सरकार काय करणार अशी विचारणा त्यांनी केली.
लाडक्या बहिण योजनेवर केल्या जाणाऱ्या खर्चात कपात करण्यात आली आहे, असंही उद्धव म्हणाले. जी काम सुरू आहे, त्याचीच माहिती अर्थ संकल्पात देण्यात आली आहे. हा अर्थसंकल्प अतिशय बोगस अर्थसंकल्प आहे असंही ते म्हणाले. लोकांची चहुबाजूने फसवणूक करून सत्ता मिळवली आहे. तसाच हा अर्थसंकल्पही असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. संपूर्ण अर्थ संकल्पावर उद्धव यांनी भाष्य करताना सरकारला धारेवर धरलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world