जाहिरात

Raj Thackeray: ठाकरेंचं 'ठरलं'? राज-उद्धव यांच्यातील जवळीक वाढली; महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होणार?

Raj and Uddhav Thackeray Coming Together? :  राज ठाकरे मनसे पक्ष उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत विलीन करणार का? अशी चर्चा आता सुरु झाली आहे.

Raj Thackeray: ठाकरेंचं 'ठरलं'? राज-उद्धव यांच्यातील जवळीक वाढली; महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होणार?
Raj Thackeray Uddhav Thackeray : केवळ बोलण्यातूनच नाही, तर कृतीतूनही ठाकरे बंधूंमधील जवळीक वाढल्याचे दिसून येत आहे.
मुंबई:

Raj and Uddhav Thackeray Coming Together? :  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दोन्ही भाऊ पुन्हा एकदा राजकीयदृष्ट्या एकत्र येणार का, अशा चर्चांना आता उधाण आले आहे.  राज ठाकरे यांनी शिवसेना सोडण्याबाबत 20 वर्षांनंतर केलेली भावना, हे या चर्चेचं निमित्त ठरलं आहे. 

शिवसेना सोडणं हे माझ्यासाठी केवळ पक्ष सोडणं नव्हतं, तर ते घर सोडण्यासारखं होतं, असं भावूक विधान राज ठाकरे यांनी केलं आहे. 2005 मध्ये  राज ठाकरेंनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला होता, तेव्हा त्यांनी 'माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलंय' असं म्हटलं होतं. मात्र,  2026 मध्ये आता २१ वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर राज ठाकरेंच्या सुरात बदल झाला असून त्यांनी घरवापसीचे संकेत दिल्याचे बोलले जात आहे.

राज ठाकरेंचा तो सूचक इशारा

राज ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरेंसमोर  केलेल्या भाषणात अत्यंत महत्त्वाचे वक्तव्य केले. ते म्हणाले की, गेल्या वीस वर्षांत काही गोष्टी मला उमगल्या आहेत आणि कदाचित त्या उद्धव ठाकरेंनाही उमगल्या असतील. आता जे झालं गेलं, ते विसरून जाऊ द्या. 

राज यांच्या या वक्तव्यामुळे ही सर्व चर्चा सुरु झाली आहे. केवळ बोलण्यातूनच नाही, तर कृतीतूनही ठाकरे बंधूंमधील जवळीक वाढल्याचे दिसून येत आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात दोन्ही भाऊ अत्यंत मोकळेपणाने वावरताना दिसले. त्यांच्यातील अवघडलेपण दूर होऊन ते एकमेकांशी मनापासून हसून संवाद साधत होते.

( नक्की वाचा : Raj Thackeray : 'माझ्यासाठी पक्ष सोडणं नव्हतं.. ' थेट उद्धव ठाकरेंसमोर राज ठाकरेंनी मांडली वेदना, पाहा VIDEO )

'माझं घर सुटल्याचं दुःख जास्त होतं'

बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीनिमित्त 'सामना'मध्ये राज ठाकरे यांनी 'माझा काका' नावाचा एक विशेष लेख लिहिला आहे. या लेखात त्यांनी मातोश्रीवरील जुन्या आठवणींना उजाळा दिला. राज ठाकरे लिहितात की, जेव्हा मी वेगळी राजकीय चूल मांडली, तेव्हा मला सर्वात जास्त त्रास एकाच गोष्टीचा होत होता की माझ्या माणसांना आता पूर्वीसारखं मला भेटता येणार नाही. 

वडिलांचं छत्र आधीच हरपलं होतं आणि आता मी माझ्या काकापासूनही दूर गेलोय, हा विचार मनाला खात होता. पक्षातून बाहेर पडण्यापेक्षा घरातून बाहेर पडण्याचं दुःख खूप जास्त होतं, अशी कबुली त्यांनी या लेखात दिली आहे. ही रुखरुख राज ठाकरेंना आता पुन्हा घराकडे म्हणजेच शिवसेनेकडे खेचून आणणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

( नक्की वाचा : Raj Thackeray : 'शिसारी आलीय...'; कल्याण-डोंबिवलीतील प्रकारावर राज ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया )
 

मंचावर गळाभेट आणि रश्मी ठाकरेंनी दिला निरोप

षण्मुखानंद हॉलमध्ये झालेल्या सोहळ्यात काही खास क्षण पाहायला मिळाले. आदेश बांदेकरांनी जेव्हा उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंचा सत्कार करण्याची विनंती केली, तेव्हा दोन्ही भावांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य होते. सत्कार करताना शाल देण्याघेण्याच्या निमित्ताने दोघांमधील जिव्हाळा दिसून आला. 

इतकंच नाही, तर जेव्हा राज ठाकरे भाषण संपवून निघाले, तेव्हा रश्मी ठाकरे स्वतः त्यांना निरोप देण्यासाठी बाहेरपर्यंत आल्या होत्या. ही देहबोली ठाकरे कुटुंब खऱ्या अर्थाने एकत्र येत असल्याचे दर्शवत आहे. संजय राऊत यांनीही राज ठाकरेंच्या विधानावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, पक्ष म्हणून एकत्र आलो आहोत, तर सगळं विसरायला हवं हे वाक्य खूप महत्त्वाचे आहे.

राजकीय समीकरणं आणि विलीनीकरणाची शक्यता

राजकीयदृष्ट्या पाहिलं तर 2009 मध्ये विधानसभेत मनसेचे 13 आमदार निवडून आले होते, पण त्यानंतर मनसेला निवडणुकीत अपेक्षित यश मिळालेलं नाही. पक्षविस्तार करताना राज ठाकरेंना अनेक मर्यादा आल्या आहेत. दुसरीकडे, शिवसेना फुटल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या गटालाही आता मोठ्या संघटनात्मक ताकदीची गरज आहे. 

मुंबई महापालिका निवडणुकीच्या निकालांनी हे सिद्ध केलंय की मुंबईत ठाकरेंची ताकद अजूनही कायम आहे. उद्धव ठाकरेंनीही आपल्या कार्यकर्त्यांचे कौतुक करत मुंबईची लढाई उत्तम लढल्याचे म्हटले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर, जर राज ठाकरेंना घर सोडल्याची सल असेल आणि उद्धव ठाकरेंनाही भविष्यातील संघर्षाची जाणीव असेल, तर आगामी काळात मनसे आणि शिवसेना यांचे विलीनीकरण झाले तर आश्चर्य वाटायला नको.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com