23 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागला. महायुतीला या निवडणुकीमध्ये प्रचंड बहुमत मिळाले. यानंतर सत्तास्थापनेसाठी बराच विलंब झाला होता. 5 डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यांच्यासोबत एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. आतापर्यंत या तिघांनीच मंत्रिपदाची शपथ घेतली असून मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार याबाबतचा सस्पेन्स निर्माण झाला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
फडणवीस, पवार दिल्लीमध्ये; एकनाथ शिंदे मुंबईतच
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. एकनाथ शिंदे मात्र मुंबईतच आहेत. मंत्रिमंडळ विस्तार, खातेवाटप यावरून एकनाथ शिंदे नाराज असल्याने ते मुंबईतच थांबले असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. देवेंद्र फडणवीसांना याबाबत विचारले असता त्यांनी एकनाथ शिंदे नाराज नाहीत असे सांगितले. आपण वेगळ्या कामासाठी दिल्लीत आलो असून अजित पवार हे त्यांच्या कामासाठी दिल्लीत आले आहेत असे फडणवीसांनी सांगितले. एकनाथ शिंदेंचे दिल्लीत काम नसल्याने ते मुंबईतच आहेत असे फडणवीस म्हणाले.
नक्की वाचा : शरद पवार- अजित पवारांची दिल्लीत भेट! काय झाली चर्चा? दादा म्हणाले....
मंत्रिमंडळ विस्तार कधी ?
फडणवीसांनी यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटले की महायुतीतील तीनही घटक पक्षांचे प्रमुख नेते त्यांच्या पक्षातून कोणाला मंत्रिपद द्यायचे हे ठरवतील. भाजपमधून कोणाला मंत्रिपद द्यायचे याबाबतची चर्चा काल रात्री भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांसह अन्य महत्त्वाच्या नेत्यांसह झाल्याचे फडणवीसांनी सांगितले. मंत्रिमंडळासाठीचा फॉर्म्युलाही ठरला असून लवकरच तो तुम्हाला कळेल असे फडणवीसांनी सांगितले. अजित पवारांना मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की आम्हाला 14 डिसेंबर रोजी मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे सांगण्यात आल्याचे म्हटले.
मंत्रिमंडळ विस्ताराचा काय असेल फॉर्म्युला
महायुतीमध्ये सुरु असलेला मंत्रिमंडळ विस्ताराचा तिढा अखेर सुटला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी याबाबत तोडगा काढला असून मंत्रिमंडळ विस्ताराची तारीखही जवळपास निश्चित झाली असल्याचे सांगण्यात येत आहे.. महायुतीमध्ये भाजपच्या वाट्याला 20 शिवसेना शिंदे गटाला 12 तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला 10 जागा मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक झाली. या बैठकीमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराचा हा फॉर्म्युला फायनल करण्यात आला आहे. त्याचबरोबर 14 डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार होईल, अशीही माहिती समोर आली आहे. या फॉर्म्युल्याबाबत लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. आता खाते वाटप कसे होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.