मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथ घेऊन आता आठवडा उलटला आहे. त्यानंतरही अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. नागपूरमध्ये 16 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन होत आहे. या अधिवेशनाच्यापूर्वी हा विस्तार केला जाईल, असे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी नुकत्याच झालेल्या दिल्ली दौऱ्यात त्याबाबत भाजपाच्या पक्षश्रेष्ठींशी चर्चा देखील केली आहे.
भाजपाच्या कोट्यातील मंत्र्यांची यादी तयार करण्याचं काम अंतिम टप्प्यात आलंय. त्याचवेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेच्या कोणत्या आमदारांना मंत्रिपदाची संधी देणार याकडं सर्वांचं लक्ष लागलंय. शिवसेनेच्या संभाव्य मंत्र्यांची यादी 'NDTV मराठी' च्या हाती आलीय. त्यानुसार यापूर्वी शिंदे यांच्या मंत्रिमंडळातील 4 जणांना फडणवीसांच्या मंत्रिमंडळात संधी मिळणार नाही.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
दीपक केसरकर, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत आणि संजय राठोड या चार मंत्र्यांना नव्या मंत्रिमंडळात स्थान मिळणार नाही, अशी माहिती सूत्रांनी दिलीय. भारतीय जनता पार्टीनं या 3 जणांचा मंत्रिमंडळात समावेश करु नये असा आग्रह धरला होता, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. भाजपाचा हा आग्रह एकनाथ शिंदे यांनी मानलाय, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
( नक्की वाचा : '.... आणि रणजीतसिंह मोहिते पाटलांना राणेंनी हाकलून लावले', गोपीचंद पडाळकर यांचा गौप्यस्फोट )
शिवसेनेच्या संभाव्य मंत्र्यांमध्ये उदय सामंत, शंभूराजे देसाई, गुलाबराव पाटील आणि दादा भुसे या चार जणांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांच्याच ठाणे शहरातील आणखी एक आमदार प्रताप सरनाईक यांनाही यंदा मंत्रिपद मिळू शकतं. त्याचप्रमाणे मंत्रिपदासाठी गेल्या अडीच वर्षांपासून प्रयत्न करणाऱ्या संजय शिरसाठ आणि भरत गोगावले यांचंही नाव संभाव्य मंत्रिपदाच्या यादीमध्ये आहे.
त्याचबरोबर आशिष जयस्वाल, योगेश कदम, विजय शिवतारे यांचाही मंत्रिमंडळातील प्रवेश नक्की मानला जातोय. त्याचबरोबर कोल्हापूरमधील शिवसेना आमदार प्रकाश आबिटकर आणि राजेंद्र याड्रावकर यांच्यापैकी एकाचा मंत्रिमंडळात समावेश होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
( नक्की वाचा : INDIA मधील राहुल गांधींची जागा धोक्यात, ममतांच्या खांद्यावरुन लालूंची फायरिंग )
शिंदेंचा अडीच वर्षांचा फॉर्म्युला
शिवसेनेत मंत्रिपदासाठी इच्छूक आमदारांची संख्या मोठी आहे. त्यामुळे शिवसेनेच्या मंत्र्यांसाठी अडीच-अडीच वर्षांचा फॅार्म्युला ठरला असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिलीय. मंत्र्यांचा पहिल्या अडीच वर्षाचा कालावधी संपल्यावर दुसऱ्या आमदारांना पुढील अडीच वर्षाचा कालावधी मंत्रिपदासाठी मिळणार आहे.