ठाण्याचे महापौरपद ते मुख्यमंत्रिपद... एकनाथ शिंदेंच्या नाराजीची 19 वर्षांची परंपरा, वाचा सविस्तर

एकनाथ शिंदे 2019 साली त्यांचे तेव्हाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर नाराज झाले आणि पुढचा इतिहास सर्वांना माहिती आहे. पण, शिंदे यांच्या नाराजीनाट्याचं ते एकमेव उदाहरण नाही. गेल्या 19 वर्षांमध्ये शिंदे अनेकदा नाराज झाले आहेत. 

जाहिरात
Read Time: 4 mins
मुंबई:

राज्यात 20 नोव्हेंबर रोजी झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला अभूतपूर्व यश मिळालं आहे. महायुतीला स्पष्ट जनादेश मिळालाय. त्यानंतरही मुख्यमंत्रीपदाचा तिढा सुटलेला नाही. एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपद हवं असल्याच्या चर्चा सध्या रंगलीय. त्यासाठी शिंदे नाराज असल्याचं मानलं जातंय. भाजपा आणि शिवसेना नेते जाहीरपणे काहीही सांगत असले तरी पडद्याआड 'ऑल इज वेल' नाही अशी कुजबुज सध्या सुरु आहे. शिंदे 2019 साली त्यांचे तेव्हाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर नाराज झाले आणि पुढचा इतिहास सर्वांना माहिती आहे. पण, शिंदे यांच्या नाराजीनाट्याचं ते एकमेव उदाहरण नाही. गेल्या 19 वर्षांमध्ये शिंदे अनेकदा नाराज झाले आहेत. 

2005- ठाण्याचे महापौर कोण होणार?
 
एकनाथ शिंदे यांच्यावर 2005 साली शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुखपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यानंतर अवघ्या काही महिन्यांनी  झालेल्या महापौर पदाच्या निवडणुकीत महापौरपदाचा मान हा ठाणे शहर की वागळे इस्टेट पट्ट्याला दयायचा यावरून वाद झाला होता. तेव्हा सर्वात प्रथम एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा होती ठाण्याचा महापौर कोण होणार? याबाबत शिवसेनेत दोन गट होते. अखेर मोठ्या वादानंतर राजन विचारे महापौर झाले. 

( नक्की वाचा : अजित पवारांच्या राष्ट्रवादीची मुख्यमंत्रीपदासाठी फडणवीसांना पसंती का आहे? 3 कारणं )

2006- संपर्क प्रमुखाची नियुक्ती 

ठाण्याच्या महापौरपदाचा प्रश्न मिटल्यानंतर वर्षभरानंतरच 2006 साली पुन्हा एकदा शिंदे नाराज असल्याची चर्चा होती. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांच्यावर ठाणे जिल्हा संपर्क नेते ही जबाबदारी देण्यात आली होती. या नियुक्तीनं एकनाथ शिंदे नाराज झाले होते. ही नाराजी अधिक वाढू नये म्हणून 2007 साली महापालिका निवडणुकांच्या तोंडावर उद्धव ठाकरेंना देसाईंची नियुक्ती रद्द करण्यात आली. 

2009 - जिल्हा संपर्कप्रमुख

2009 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत ठाण्यात शिवसेना उमेदवार विजय चौगुले यांचा पराभव झाला होता. या निकालानंतर त्यावेळी शिवसेनेच्या रचनेत अखंड असलेल्या ठाणे जिल्ह्याची विभागणी करण्यात आली. ठाण्याचे जिल्हाप्रमुख म्हणून एकनाथ शिंदे आणि कल्याणचे प्रभारी जिल्हाप्रमुखपदी गोपाळ लांडगे यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यावेळी जिल्हाप्रमुखपदाच्या झालेल्या विभागणीवर एकनाथ शिंदे हे नाराज होते. ही नाराजी दूर करण्यासाठी अखेर अखंड ठाणे जिल्ह्याचे संपर्कप्रमुख म्हणून त्यांच्यावर पक्षानं जबाबदारी दिली.

Advertisement

( नक्की वाचा : Maharashtra Election Result 2024 : ते पुन्हा आले ! फडणवीसांच्या दमदार यशाचं रहस्य काय? )

पृथ्वीराज चव्हाणांनी दिली होती ऑफर?

पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा सातत्याने होत होती. चव्हाण यांनी शिंदे यांना मंत्रिपदाची ऑफर दिल्याची कुजबूत राजकीय वर्तुळात होत होती. मात्र त्यावेळीही एकनाथ शिंदे यांची नाराजगी दूर करण्यात तत्कालीन शिवसेना नेतृत्वाला यश आले. 

2014 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपा युती तुटली. त्यावेळी निवडणूक निकालानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद हे एकनाथ शिंदे यांच्याकडे देण्यात आले. मात्र अवघ्या एका महिन्यातच शिवसेना भाजपाबरोबर राज्यातील सत्तेत सहभागी झाली. तेव्हा शिवसेनेच्या वाट्याला आलेले महत्वाचे सार्वजनिक बांधकाम मंत्रीपद हे एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आले. परंतु एकनाथ शिंदे यांचे राजकीय महत्व वाढू नये म्हणून त्यावेळी शिवसेनेने जाणीवपूर्व उपमुख्यमंत्रीपद  स्वीकारले नव्हते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती.

Advertisement

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

.... आणि शिंदेंनी केलं बंड

2019 मधील विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या राजकीय उलथापालथीमध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचं राज्यात सरकार स्थापन झालं. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये सुरुवातीला मुख्यमंत्रीपद  एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवण्यात येईल अशी चर्चा होती. मात्र तेव्हा मुख्यमंत्री पदावर स्वतः खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे विराजमान झाले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानं तेव्हा एकनाथ शिंदे नाराज होते. 

शिंदे यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना नगर विकास या  महत्त्वाच्या खात्याची जवाबदारी सोपविण्यात आली. मात्र त्यानंतरही सातत्याने एकनाथ शिंदे हे शिवसेना पक्षात नाराज असल्याची चर्चा होत होती. 

Advertisement

( नक्की वाचा : EVM तर फक्त बहाणा, काँग्रेसला निवडणूक निकालापूर्वीच लागली होती पराभवाची चाहूल, सत्य उघड )
 

2022 ला झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीच्या वेळी शिवसेना पक्षाकडून एकनाथ शिंदे यांना निवडणूक रणनीतीपासून लांब ठेवण्यात आले. या घटनेनंतर एकनाथ शिंदे यांची नाराजी वाढतच गेली. त्यानंतर अवघ्या पंधरा दिवसानंतरच झालेल्या विधानपरिषदेच्या  निवडणुकीच्या निकालाच्या रात्री एकनाथ शिंदे यांचे ऐतिहासिक बंड  झाले. या बंडानंतर शिवसेनेत फूट पडली. भाजपाच्या पाठिंब्यानं शिंदे मुख्यमंत्री झाले. 

एकनाथ शिंदे यांनी अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद सांभाळले. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीनं शिंदेंच्या नेतृत्त्वाखाली विधानसभा निवडणुका लढवल्या. या निवडणुकीत महायुतीला अभूतपूर्व यश मिळाले. भाजपाला सर्वाधिक जागा मिळाल्या. त्यामुळे भाजपानं मुख्यमंत्रीपदावर दावा सांगितला. भाजपाकडे मुख्यमंत्रीपद जाणार असल्यानं पुन्हा एकदा एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चेनं जोर धरला आहे.