जाहिरात

EVM तर फक्त बहाणा, काँग्रेसला निवडणूक निकालापूर्वीच लागली होती पराभवाची चाहूल, सत्य उघड

EVM तर फक्त बहाणा, काँग्रेसला निवडणूक निकालापूर्वीच लागली होती पराभवाची चाहूल, सत्य उघड
मुंबई:

राज्यात 20 नोव्हेंबर रोजी झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा मोठा पराभव झाला आहे. या निवडणुकीत काँग्रेसला फक्त 16 जागा मिळाल्या. महाविकास आघाडीतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षांना अनुक्रमे 20 आणि 10 जागांवर समाधान मानावं लागलंय. या पराभवानंतर महाविकास आघाडीनं इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनला (EVM) दोष देण्यास सुरुवात केलीय. पण, महाविकास आघाडीचा हा पराभव अनपेक्षित नव्हता. काँग्रेसला निवडणूक निकालापूर्वीच काँग्रेसला या पराभवाची चाहूल लागली होती. पक्षानं घेतलेल्या अंतर्गत सर्वेक्षणातून या पराभावाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता, हे सत्य आता समोर आलंय.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

लोकसभेत विजय, विधानसभेत धक्का

काँग्रेस पक्षाला हरयणा पाठोपाठ महाराष्ट्रातही लोकसभा निवडणुकीतील कामगिरीची पुनरावृत्ती करण्यात अपयश आलं. लोकसभा निवडणुकीनंतर पाच महिन्यानंतर झालेल्या हरियाणा विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसला सत्ता मिळवण्यात अपयश आलं होतं.  त्यानंतर नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत पक्षाला धक्का बसला.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसनं राज्यात 13 जागांवर विजय मिळवला होता. त्यामुळे विधानसभेत सर्वात मोठ्या पक्षासह मुख्यमंत्री आपल्याच पक्षाचा असेल असा दावा काँग्रेस नेते करत होते. काँग्रेसचे अनेक नेते मंत्री कोण होणार? मुख्यमंत्री कोण होणार? यासाठीच मोर्चेबांधणी करत होते, असा खुलासा त्यांच्याच मित्रपक्षातील नेते अंबादास दानवे यांनी केला आहे. प्रत्यक्षात काँग्रेसला निवडणूक निकालापूर्वीच पराभवाचा अंदाज आला होता. अंतर्गत सर्वेक्षणातूनच ही काँग्रेसला हे सत्य समजलं होतं, असं वृत्त 'इंडियन एक्स्प्रेस'नं दिलं आहे.

महाविकास आघाडीतील मतभेद उघड! शिवसेनेच्या बड्या नेत्यानं काँग्रेसवर फोडलं पराभवाचं खापर

( नक्की वाचा : महाविकास आघाडीतील मतभेद उघड! शिवसेनेच्या बड्या नेत्यानं काँग्रेसवर फोडलं पराभवाचं खापर )

काय होतं सर्वेक्षण?

लोकसभा निवडणुकीनंतर निर्माण झालेली अनुकूल परिस्थिती कायम राखण्यात काँग्रेस पक्षाला अपयश आलं आहे, असं या सर्वेक्षणातून उघड झालं आहे. विधानसभा निवडणुकीला 4 आठवड्यांपेक्षा कमी कालावधी असताना ऑक्टोबर महिन्यात हे सर्वेक्षण करण्यात आले होते. या सर्वेक्षणात 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेचा सत्तारुढ महायुतीला फायदा होणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं होतं. 

103 मतदारसंघात झालेल्या या सर्वेक्षणात लोकसभा निवडणुकीत 54 जागांवर महाविकास आघाडी लोकसभेत आघाडीवर होती. पण, विधानसभेत त्यापेकी 44 जागांवरच मविआ आघाडीवर असल्याचं सर्वेक्षणातून स्पष्ट झालं होतं. तर महायुतीची आघाडी 49 वरुन 56 जागांवर वाढली होती.

Exclusive : राज्यात सत्तास्थापनेचा फॉर्म्युला ठरला, कसं असेल संभाव्य मंत्रिमंडळ?

( नक्की वाचा : Exclusive : राज्यात सत्तास्थापनेचा फॉर्म्युला ठरला, कसं असेल संभाव्य मंत्रिमंडळ? )

या 103 जागांमध्ये काँग्रेस  52, शिवसेना (उबाठा) 28, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार 21 तर माकप आणि समाजवादी पार्टीचे प्रत्येकी एक उमेदवार निवडणूक लढवत होते. 

मुस्लीमवगळता अन्य सर्व गटामध्ये महाविकास आघाडी महायुतीपेक्षा पिछाडीवर आहे, असा अंदाज या सर्वेक्षणातून व्यक्त करण्यात आला होता. काँग्रेसच्याच अंतर्गत सर्वेक्षणानुसार सामान्य (जनरल), ओबीसी (OBC), एसबीसी (SBC), एसी (SC), एईबीसी (SEBC), एसटी (ST) या सर्व घटकांमध्ये महायुती महाविकास आघाडीपेक्षा आघाडीवर होती.

'लाडकी बहीण' गेमचेंजर

'लाडकी बहीण योजना' माहिती आहे का? हा प्रश्न 57,309  जणांना या सर्वेक्षणातून विचारण्यात आला होता. तर त्यावर सुमारे 88 टक्के जणांनी होकारार्थी उत्तर दिलं. 82 टक्के जणांनी या योजनेचे लाभार्थी आपल्या कुटुंबात असल्याची माहिती दिली. इतकंच नाही तर 17 टक्के जणांनी 'लाडकी बहीण' योजनेमुळे मत देण्याचे प्राधान्य बदललं असल्याचं या सर्वेक्षणात स्पष्ट केलं होतं.

EVM फक्त बहाणा!

'आमची पिछेहाट होत आहे, हे आम्हाला माहिती होतं. शेवटच्या टप्प्यात महायुती आमच्यापुढं असल्याचं आमच्या लक्षात आलं होतं. पण, त्यांचा विजय आणि आमच्या पराभवातील इतकं मोठं अंतर आमच्यासाठी आश्चर्यकारक होतं, असं या सर्वेक्षणाची माहिती असणाऱ्या एका काँग्रेस नेत्यानं या वृत्तपत्राला सांगितलं. 

Maharashtra Election Result : शिवसेना शिंदेंचीच, महाराष्ट्राचा फैसला! बालेकिल्ल्यात ठाकरेंना धक्का

( नक्की वाचा :  Maharashtra Election Result : शिवसेना शिंदेंचीच, महाराष्ट्राचा फैसला! बालेकिल्ल्यात ठाकरेंना धक्का )

लोकसभा निवडणुकीती यश टिकवणं अवघड असल्याचं आम्हाला माहिती होतं. विशेषत: महिला मतदारांमध्ये महायुतीचा प्रभाव वाढत होता. हा सर्व डेटा नेतृत्त्वाकडं आहे. पण, ते तरीही EVM वर दोष टाकत आहेत. राज्य आणि केंद्रीय नेतृत्त्वासाठी ते सोयीचं आहे, अशी कबुली या नेत्यानं दिली. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com