विधानसभेसाठी प्रचारपूर्व कामाची ब्लू प्रिंट तयार, राज ठाकरेंचा नवा आदेश काय?

Raj Thackeray MNS :  लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठी मनसे कामाला लागली आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
Raj Thackeray
मुंबई:

Raj Thackeray MNS :  लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठी मनसे कामाला लागली आहे. राज्याच्या विधानभा निवडणुका ऑक्टोबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत 200 ते 225 जागा लढवण्याची घोषणा राज ठाकरे यांनी यापूर्वीच केली आहे. त्यानंतर आता ठाकरे यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना नवा आदेश दिलाय. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

प्रचारपूर्व कामाची ब्लू प्रिंट

विधानसभा निवडणुकीपूर्वी मनसे नेते सर्व मतदारसंघांचा आढावा घेणार आहेत. त्यासाठी तीन-तीन जणांची टीम प्रत्येक विधानसभा मतदारसंघात जाऊन सर्वेक्षण करणार आहे. मतदार संघांतील स्थानिक प्रश्न आणि मनसेची ताकद याची यामध्ये चाचपणी केली जाणार आहे. तीन जणांच्या टीमला विधानसभा मतदारसंघाचे अहवाल तयार करण्याचे आदेश राज ठाकरे यांनी दिले आहेत. 

राज ठाकरे परदेश दौ-यावरून आल्यावर सर्व अहवालांचा आढावा घेणार आहेत. अहवालाचा अंदाज घेऊन राज ठाकरे महाराष्ट्राच्या दौ-यावर जातील. सर्वच विधानसभा मतदारसंघात मनसे सर्वेक्षण करणार आहे. 

( नक्की वाचा : 'मुख्यमंत्र्यांनी दाढी वाढवावी पण दाढीवाल्यांना मदत करु नये', मनसेचा टोला )
 

मनसे किती जागा लढवणार?

यापूर्वी मुंबईतील रंगशारदा सभागृहात मनसे कार्यकर्त्यांचा मेळावा झाला होता. त्यामध्ये राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी (Raj Thackeray on Vidhan Sabha Election) पक्षाची दिशा जाहीर केली होती. मनसे आगामी विधानसभा निवडणूक लढणार का ? महायुतीसोबत मिळून लढणार का ? मनसे किती जागांवर उमेदवार उभे करणार असे प्रश्न खुद्द मनसेच्या कार्यकर्त्यांनाही पडले होते. या प्रश्नांची उत्तरे राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात दिली होती. मनसेने महायुतीकडे 20 जागा मागितल्या आहेत, अशा काही जणांनी पुडी सोडली होती. मनसे 20 जागा का मागणार? त्या आपल्याला कोण देणार ? असे सवाल करत राज ठाकरेंनी मनसे राज्यात 200 ते 225 जागा लढणार असल्याचं जाहीर केलं होतं. 

Advertisement

मुंबईतील 3 उमेदवार ठरले

मनसेनं मुंबईतील तीन विधानसभा मतदारसंघासाठी त्यांचे उमेदवार देखील निश्चित केले आहेत.  वरळीचे आमदार असलेल्या शिवसेना उबाठाच्या आदित्य ठाकरेंविरोधात संदीप देशपांडे यांचं नाव पक्षाकडून निश्चित करण्यात आलंय. माहीममधून मनसे नितीन सरदेसाई यांना उमेदवारी देण्यात येणार आहे तर शिवडीमधून बाळा नांदगांवकर यांना उमेदवारी देण्यात येणार आहे. या नावांची मनसेचे अधिकृत घोषणा केली नसली तर या तिघांना आपापल्या मतदारसंघात प्रचाराला लागण्यास सांगितलं असल्याची सूत्रांची माहिती आहे.
 

Topics mentioned in this article