Sharad Pawar: शरद पवारांना एकाच वेळी दोन धक्के! दोन माजी मंत्री भाजपाच्या वाटेवर, पक्षाला मोठा सुरुंग

Major Blow to Sharad Pawar: शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एकाच वेळी दोन मोठे धक्के बसण्याची चिन्हे आहेत.

जाहिरात
Read Time: 3 mins
Major Blow to Sharad Pawar: विधानपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या राजकारणात पक्षांतराचे वारे वाहू लागले आहेत
मुंबई:

Major Blow to Sharad Pawar: विधानपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या राजकारणात पक्षांतराचे वारे वाहू लागले आहेत.  शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एकाच वेळी दोन मोठे धक्के बसण्याची चिन्हे आहे. पवारांनी मोठ्या विश्वासाने तयार केलेली तरुण नेत्यांची फळी आता विखुरताना दिसत असून, अहिल्यानगर आणि जालना या दोन महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये शरद पवारांना मोठा सुरुंग लागण्याची शक्यता आहे.

शरद पवारांना बसणारा 'डबल' धक्का

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे दोन दिग्गज नेते आणि माजी मंत्री आता भाजपाच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा आहे. यामध्ये प्राजक्त तनपुरे यांचा भाजप प्रवेश आता जवळपास 'फिक्स' मानला जात असून, दुसरीकडे माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे देखील भाजपामध्ये जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. एकाच वेळी दोन माजी मंत्री पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याने शरद पवारांच्या चिंतेत मोठी वाढ झाली आहे.

Advertisement

(नक्की वाचा : Vidhan Parishad : विधानपरिषदेसाठी मविआची रणनीती ठरली; कोणत्या पक्षाला किती आणि कोणत्या जागा? वाचा सविस्तर )

प्राजक्त तनपुरेंचा प्रवेश आता केवळ औपचारिकता?

अहिल्यानगर जिल्ह्याचे वजनदार नेते प्राजक्त तनपुरे यांचा भाजप प्रवेश आता निश्चित झाला असल्याचे समजते. उद्या म्हणजेच रविवार, 30 मे रोजी ते अधिकृतपणे कमळ हाती घेतील. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या वेळी त्यांनी माघार घेतली होती, तेव्हाच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांना काही महत्त्वाची आश्वासने दिली होती. तेव्हापासूनच तनपुरे भाजपमध्ये जाणार हे मानले जात होते. विशेष म्हणजे, प्राजक्त तनपुरे हे जयंत पाटील यांचे सख्खे भाचे असल्याने त्यांनी घेतलेला हा निर्णय शरद पवारांसह जयंत पाटील यांना वैयक्तिक धक्का देखील मानला जात आहे.

राजेश टोपेंच्या नावाची राजकीय वर्तुळात चर्चा

दुसरीकडे, जालन्यातील घनसावंगी मतदारसंघाचे प्रमुख नेते आणि राज्याचे माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे हे देखील भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मे 2026 मध्ये स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून ते भाजपाच्या तिकिटावर विधान परिषद लढवतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. टोपे यांनी यापूर्वी पक्ष सोडण्याचे वृत्त फेटाळले असले, तरी सध्याची बदललेली राजकीय परिस्थिती पाहता ते देखील भाजपचा मार्ग धरू शकतात, असे संकेत मिळत आहेत. दरम्यान राजेश टोपे यांनी ही बातमी लिहित असताना पुन्हा एकदा भाजपा प्रवेशाची शक्यता फेटाळली आहे. 

( नक्की वाचा : मुख्यमंत्री कार्यालयातून नक्की कुणाचे फोन आले? जरांगे पाटलांच्या 'त्या' दाव्याने खळबळ, आता आरपारची लढाई! )

राजकीय गणिते बदलणार

या दोन मोठ्या नेत्यांच्या संभाव्य प्रवेशामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल होणार आहेत. अहिल्यानगरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद जागेसाठी भाजपकडून प्राजक्त तनपुरे यांच्या नावाचा विचार होऊ शकतो. तर मराठवाड्यात राजेश टोपे यांच्या रूपाने पवारांना मोठी पोकळी सहन करावी लागू शकते. एका बाजूला मराठा आरक्षणाचे आंदोलन सुरू असतानाच, राजेश टोपे यांचा संभाव्य भाजपा प्रवेश हा मराठवाड्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलणारा ठरू शकतो.
 

Topics mentioned in this article