Vidhan Parishad Election 2026: विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकांचे काऊंटडाऊन आता सुरु झालं आहे. या निवडणुकीसाठी विरोधकांच्या महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला आहे. 17 पैकी 15 जागांवर तिन्ही पक्षांनी मोहोर उमटवली आहे. मात्र, उर्वरित 2 जागांवरून सुरू असलेली रस्सीखेच मविआतील नेत्यांची डोकेदुखी वाढवणारी ठरत आहे.
काँग्रेस ठरला मोठा भाऊ
या जागावाटपामध्ये काँग्रेसने आपली ताकद दाखवून देत सर्वाधिक जागा पदरात पाडून घेतल्या आहेत. मविआच्या ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार काँग्रेसला तब्बल 7 जागा मिळाल्या आहेत. यात प्रामुख्याने विदर्भातील चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा आणि अमरावती या जागांचा समावेश आहे. याशिवाय पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर आणि धाराशीवसह उत्तर महाराष्ट्रातील अहिल्यानगर (अहमदनगर) या जागांवरही काँग्रेसचे उमेदवार नशीब आजमावतील. विदर्भातील आपली पकड कायम ठेवण्यात काँग्रेसला यश आल्याचे यातून दिसत आहे.
( नक्की वाचा : Ashok Kharat: "वरून सर्व सेटिंग झालीय का?"; खळबळजनक दाव्याने खरात प्रकरणाला नवीन वळण, नेमकं काय घडलं? )
ठाकरे गटाचा मराठवाडा आणि कोकणावर जोर
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आपल्या वाट्याला आलेल्या 5 जागांसाठी प्रामुख्याने मराठवाडा आणि कोकण पट्ट्याची निवड केली आहे. छत्रपती संभाजीनगर, हिंगोली आणि परभणी या मराठवाड्यातील महत्त्वाच्या जागा ठाकरे गटाकडे राहतील. तसेच उत्तर महाराष्ट्रातील जळगाव आणि कोकणातील रायगड या जागांवरही मशाल धगधगणार आहे. आपल्या बालेकिल्ल्यांमध्ये संघटनात्मक ताकद टिकवून ठेवण्यासाठी ठाकरे गटाने या जागांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे.

शरद पवार गटाची रणनीती आणि पुणे-ठाणे
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला या फॉर्म्युल्यात 3 जागा मिळाल्या आहेत. शरद पवार यांनी आपल्या पारंपरिक बालेकिल्ल्यांना प्राधान्य दिले असून यात पुणे आणि सातारा-सांगली मतदारसंघाचा समावेश आहे. विशेष म्हणजे, ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जात असला, तरी बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे ही जागा यावेळी शरद पवार गटाच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे. ठाण्यातील ही नवी गणिते येणाऱ्या काळात कशी फिरतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
( नक्की वाचा : Dombivli News:डोंबिवलीतील पिंपळेश्वरनंतर आता 'मिशन मलंगगड आणि दुर्गाडी'; भाजपा नेत्याचा मोठा इशारा )
दोन जागांवर अजूनही पेच कायम
मविआने 15 जागांचे गणित सोडवले असले तरी नाशिक आणि नांदेड या 2 महत्त्वाच्या जागांवरून अद्याप एकमत होऊ शकलेले नाही. नाशिकच्या जागेवर काँग्रेस आणि ठाकरे गट या दोन्ही पक्षांनी आपला दावा ठोकला आहे. तर दुसरीकडे नांदेडमध्ये काँग्रेसची मोठी ताकद असली, तरी तिथेही मित्रपक्षांनी जागा मागितल्याने पेच निर्माण झाला आहे. या दोन जागांच्या निर्णयासाठी येत्या 2 ते 3 दिवसांत वरिष्ठ नेत्यांची बैठक होणार असून, महायुतीला रोखण्यासाठी मविआ एक पाऊल मागे घेणार की तडजोड करणार, हे लवकरच स्पष्ट होईल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world