Maharashtra Assembly Seeion 2025: शनि शिंगणापुरातील एकाही घराला कडी-कोयंडा नाही. तिथे चोरी होतच नाही कारण चोरांना शनिदेव शिक्षा करतो अशी श्रद्धा इथल्या लोकांमध्ये आहे. याच शनि मंदिराचे कामकाज पाहणाऱ्यांनी शनिदेवाच्या डोळ्यादेखत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केला आहे. या चोरांना शनिदेव आता काय शिक्षा देतो याची उत्सुकता शनि-शिंगणापूरवासीयांना आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध शनि शिंगणापूर देवस्थान हे संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. इथे देवाच्या नावावर मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका चौकशी समितीच्या अहवालातून हे भीषण वास्तव उघड झाले आहे. देवस्थानच्या कारभारात 2447 बोगस कर्मचारी दाखवून कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली होती. या समितीचा अहवाल मुख्यमंत्र्यांना प्राप्त झाला असून त्यांनी इथे घोटाळा कसा झाला त्याच्या सगळ्या डिटेल्स सभागृहातच सांगितले.
अदृश्य बागेच्या देखरेखीसाठी 80 जण
देवस्थान आतापर्यंत 250 ते 300 कर्मचाऱ्यांवर व्यवस्थित चालत होते. मात्र घोटाळेबाजांनी कागदोपत्री 2447 कर्मचारी नियुक्त केल्याचे दाखवले. हे सर्व कर्मचारी बोगस होते. देवस्थानच्या रुग्णालयात 327 कर्मचारी कार्यरत असल्याचे कागदोपत्री दाखवले होते. प्रत्यक्षात तपासणीत रुग्णालयात एकही रुग्ण नव्हता. 15 खाटा, 80 वैद्यकीय आणि 247 अकुशल कर्मचारी असे दाखवले असताना, प्रत्यक्षात केवळ 4 डॉक्टर आणि 9 कर्मचारी हजर होते. अस्तित्वात नसलेल्या रुग्णालयाच्या बागेच्या देखरेखीसाठी 80 कर्मचारी दाखवण्यात आले होते.
मंदिर संस्थानातील इतर विभागांमध्येही प्रचंड अनियमितता आढळली. या अनियमितता कोणत्या होत्या ते पाहूयात
- 109 खोल्या असलेल्या भक्तनिवासात 200 कर्मचारी कार्यरत असल्याचे दाखवले, प्रत्यक्षात 2 ते 10 कर्मचारी आढळले.
- देणगीसाठी 8 आणि तेल विक्रीसाठी 4 काउंटरवर केवळ 2 कर्मचारी काम करत असताना, तिथे 325 कर्मचारी दाखवण्यात आले.
- 13 गाड्यांच्या पार्किंगमसाठी 163 कर्मचारी दाखवले, प्रत्यक्षात 13 कर्मचारी आढळले.
- वृक्ष संवर्धन विभागात 83 कर्मचारी दाखवले, प्रत्यक्षात कोणीही नव्हते.
- शेती विभागात 65 कर्मचारी दाखवले.
- पाणी पुरवठा विभागात 79 कर्मचारी दाखवले.
- गोशाळा विभागात 82 कर्मचारी दाखवले, त्यापैकी 26 कर्मचारी रात्री 1 वाजेपासून काम करतात असे दाखवले.
- पार्किंग परिसर स्वच्छ करण्यासाठी 118 कर्मचारी दाखवले.
- सुरक्षा विभागात 315 कर्मचारी दाखवले.
- प्रसादालयात 97 कर्मचारी दाखवले, ते कुठेही दिसून आले नाहीत.
- देवस्थानच्या 13 वाहनांसाठी 176 कर्मचारी दाखवले.
- विद्युत विभागात 200 कर्मचारी दाखवले.
अस्तित्वात नसलेल्या कर्मचाऱ्यांचा पगार कार्यकर्त्यांच्या खात्यात
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, चौकशी समितीच्या, कागदोपत्री दाखवलेल्या एकूण 2474 कर्मचाऱ्यांपैकी कोणाचे मस्टर सापडले नाही, त्यांचा हजेरीपटही नव्हता आणि कोणाची सही देखील नव्हती. घोटाळेबाजांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनाच बँक खाती उघडायला लावली होती. मंदिराच्या खात्यातून अस्तित्वात नसलेल्या कर्मचाऱ्यांना नियमितपणे पगार मिळत होता. पगाराची रक्कम प्रत्यक्षात कार्यकर्त्यांच्या खात्यात जात होती.
बोगस अॅप तयार करून भक्तांना लुटले
आमदार विठ्ठल लंघे आणि आमदार सुरेश धस यांनी नकली ॲप तयार करून भाविकांकडून पूजेसाठी त्यावर पैसे घेतले जात असल्याचा प्रकारही सभागृहात उपस्थित केला होता. धस यांनी आरोप केला की या अॅपच्या माध्यमातून किमान 500 कोटींची रक्कम गोळा करण्यात आली आहे. यावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की सायबर पोलीस याचा तपास करत आहेत. धस यांनी आणखी एक आरोप केला असून त्यांनी म्हटले आहे की, बोर्डाचे ट्रस्टी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी दर महिन्याला 10 ते 20 कोटींची संपत्ती विकत घेतल्याची बाब पुढे येत आहे. यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी म्हटले की " देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की, जे ट्रस्टी लोकसेवक या संज्ञेत येत असतील त्यांच्या अपसंपदेची चौकशी केली जाईल."