आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी राजकीय पक्षांमध्ये इनकमिंगचे वारे वाहत आहेत. त्याचबरोबर आघाड्या आणि युतीबाबतच्या चर्चांनाही वेग आला आहे. अशातच 2014 च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात प्रवेश करणाऱ्या एमआयएमने देखील आता नव्या पक्षांशी जुळवून घेण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला सोबत येण्याबद्दल प्रस्ताव देणाऱ्या एमआयएमने आता पुन्हा एकदा महानगरपालिका निवडणुकीत एकत्र येण्याबद्दल प्रस्ताव दिला आहे.
( नक्की वाचा: "जिथे खड्डे खोदले तिथेच पुरून टाकेन", वक्फ बोर्डाच्या अधिकाऱ्याला इम्जियाज जलील यांची धमकी )
MIM ला सोबत घेण्यावरून मविआत पेच
एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी भाजपला सत्तेतून बाहेर करण्यासाठी आम्ही कुठेही यायला आणि कोणतीही तडजोड करायला तयार आहोत असे म्हटले आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीतही इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीला हीच ऑफर दिली होती. इतकेच नाही तर जलील आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या युतीबाबत मुंबईत बैठकाही झाल्या होत्या. मात्र, महाविकास आघाडीने एमआयएमला सोबत घेण्यास नकार दिला. पण आता पुन्हा एकदा आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जलील यांनी महाविकास आघाडीला युतीचा प्रस्ताव दिला आहे. यावर बोलताना इम्तियाज जलील म्हणाले, भाजपला सत्तेतून हटवण्यासाठी आम्ही कोणतीही तडजोड करण्यास तयार आहोत, तसेच आमच्या फार आशा-अपेक्षा नाहीत.
( नक्की वाचा: 'आम्ही विरोधक असलो तरी...', शशी थरुर- ओवेसींनी केली पाकिस्तानची पोलखोल )
ठाकरेंच्या शिवसेनेची अडचण होणार ?
महाविकास आघाडीचे जातीय समीकरण पाहिल्यास शिवसेना सारखा हिंदुत्ववादी पक्ष महाविकास आघाडीत आहे. पण एकेकाळी मुस्लिम व्होटबँक आपल्या ताब्यात ठेवणाऱ्या काँग्रेसची परिस्थिती वाईट आहे. त्यामुळे मुस्लिम मतांचा गठ्ठा मिळवायचा असल्यास महाविकास आघाडीसाठी एमआयएमला सोबत घेणे फायद्याचे ठरू शकते. परंतु, दुसरीकडे एमआयएमला सोबत घेण्याच्या भूमिकेला ठाकरे गटाचा नेहमीच विरोध राहिला आहे. यामुळे ठाकरे गटाच्या नेत्यांची भूमिका महत्त्वाची ठरेल. एमआयएमने पुन्हा एकदा युतीचा प्रस्ताव दिल्याने महाविकास आघाडीत सर्वाधिक अडचण ठाकरे यांच्या शिवसेनेची होण्याची शक्यता आहे. यावरूनच आता विरोधकांनी ठाकरे गटावर निशाणा साधला आहे.
MIM च्या प्रस्तावामुळे मविआची अडचण
एमआयएमचा विचार केल्यास गेल्या काही वर्षांत एमआयएमची महाराष्ट्रात ताकद वाढताना दिसत आहे. 2014 मध्ये छत्रपती संभाजीनगर शहरात प्रवेश करणाऱ्या एमआयएमने महापालिका निवडणुकीत 25 नगरसेवक निवडून आणले आणि शिवसेनेनंतर हा दुसरा मोठा पक्ष ठरला होता. पुढे 2019 मध्ये इम्तियाज जलील खासदार झाले. फक्त संभाजीनगरच नाही तर राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एमआयएमने एंट्री केली आहे.एमआयएमची राज्यात ताकद वाढली असली तरीही एकट्याने एमआयएमला उमेदवार निवडून आणणे शक्य नाही, हे गेल्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगरमध्ये दिसून आले. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनंतर एमआयएम नव्या साथीदाराच्या शोधात आहे. महाविकास आघाडीला युतीचा प्रस्ताव देऊन एमआयएमने एकाच बाणात दोन निशाणे साधले आहेत. एकतर शिवसेनेची अडचण केली असून, दुसरीकडे आपल्याला भाजपची 'बी टीम' असल्याचा आरोप खोडून काढण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आगामी काळात एमआयएमचा कोण मित्र आणि कोण विरोधक असणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
( नक्की वाचा: राज ठाकरे यांची आता 'मविआ' मध्ये एन्ट्री होणार? काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला काय म्हणाले? )