राकेश गुडेकर
भास्कर जाधव हे नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणासाठी चर्चेत असतात. सध्या यांचे एक व्हॉट्सअॅप स्टेटस जिल्ह्यात जोरदार चर्चेचा विषय बनले आहे. स्थानिक ब्राह्मण समाजासोबत केलेल्या वक्तव्यानंतर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, जाधवांनी विरोधकांना अप्रत्यक्षपणे इशारा देण्यासाठी हे स्टेटस ठेवले आहे. असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यांनी आपल्या स्टेटसमध्ये ज्या भावना व्यक्त केल्या आहे त्यावरून ही राजकीय अंदाज बांधले जात आहेत. मात्र जाधव यांचा हा अंदाज ही आता चर्चेचा विषय ठरला आहे.
'भिडा, नडा, एकटा बास'
भास्कर जाधव यांनी आपल्या व्हॉट्सअॅप स्टेटसवर ब्राह्मण समाजाच्या पत्राला पत्राद्वारे प्रत्युत्तर दिलं आहे. 'भिडा किती, तुम्ही नडा किती, द्या द्यायचा तेव्हढा त्रास, कितीबी समोर येवद्या, त्यांला एकटा बास' अशा आशयाचा व्हिडिओ स्टेटसला ठेवला आहे. या स्टेटसमुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. विशेषतः खोतकीबाबत केलेल्या वक्तव्यामुळे गुहागरमधील ब्राह्मण समाज आणि भास्कर जाधव यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर हे स्टेटस महत्त्वाचे मानले जात आहे.
नेमका वाद कशावरून?
काही दिवसांपूर्वी भास्कर जाधव यांनी गुहागरमधील हेदवतड येथे झालेल्या सभेत खोतकीसंदर्भात एक वक्तव्य केले होते. ज्यामुळे गुहागर मतदारसंघातील ब्राह्मण समाजामध्ये तीव्र नाराजी पसरली. यानंतर गुहागर तालुका ब्राह्मण सहाय्यक संघाने जाधवांच्या विरोधात भूमिका घेतली. जाधवांच्या वक्तव्याचा समाचार घेत निषेध केला होता. तसं पत्रही प्रसिद्ध करण्यात आलं होतं. भास्कर जाधव स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी गुहागर तालुक्यातील ऐक्याला बाधा आणत असल्याचा आरोप ब्राह्मण समाजाने केला. तसेच भास्कर जाधव यांनी राजकीय प्रवासात ब्राह्मण समाजातील अनेक उंबरठे आणि ओट्या झिजवल्याची आठवण ब्राम्हण समाजाने पत्राद्वारे करून दिली.
भास्कर जाधवांचं उत्तर काय?
ब्राह्मण सहाय्यक संघाच्या पत्राला भास्कर जाधव यांनीही पत्राद्वारे चोख प्रत्युत्तर दिलं. गुहागर तालुक्यातील लेखणीचा दहशतवाद आपणच संपवला असल्याच्या विधानावर भास्कर जाधव ठाम आहेत. मी येण्यापूर्वी गुहागरमध्ये विरोधी पक्ष निवडणूक हरला की त्याच्या घरावर दगड पडायचे. हा दहशतवाद आपण गुहागर मध्ये आल्यानंतरच संपला. याची भास्कर जाधव यांनी आठवण करून दिली. तसेच जाधव यांनी 1975 पासून राजकीय प्रवास मांडत गुहागरचे भाजपचे तत्कालीन आमदार स्वर्गीय तात्यासाहेब नातू यांच्या निवडणुकीतला प्रचारातील सक्रिय सहभागाची आठवण करून दिली. गुहागरच्या इतिहासात पहिल्यांदा ब्राम्हण व्यक्तीला पंचायत समिती सभापतीपदी विराजमान होण्याचा मान आपण मिळवून दिल्याची आठवण भास्कर जाधव यांनी करून दिली.
तसेच हेदवतड येथील भाषणात आपण कुठेही ब्राह्मण या शब्दाचा किंवा जातीचा उल्लेखही केला नव्हता. प्रत्येक पक्षाचे प्रमुख पदाधिकारी हे वेगवेगळ्या जातीचे, समाजाचे असतात. परंतु, माझ्या एका वाक्याचा संबंध तुम्ही समाजाशी जोडलात. तर मग तुम्ही पत्र काढून मराठा समाजाबद्दल, माझ्याबद्दल जे लिहिले आहे ते मराठा समाजात जाऊन मी सांगावं का? असा सवाल करत हे पत्र तुमच्याकडून कोणत्या अनाजीपंतांकडून लिहून घेतलं हेही मी समजून आहे. यालाच लेखणीचा दहशतवाद म्हणतात. परंतु, मी असल्या गोष्टींना भिक घालत नाही, असं प्रत्युत्तर भास्कर जाधव यांनी पत्रातून दिलं.
नक्की वाचा - Vande Bharat Train : पुणे-नागपूरसह वैष्णो देवीलाही जाणं सोपं होणार; तिकीट दर, वेळ वाचा सर्वकाही
दरम्यान हेच पत्र भास्कर जाधव यांनी व्हाट्सआप स्टेट्सला ठेवत दुसरा एक व्हिडीओ देखील स्टेट्सला ठेवला आहे. कितीबी समोर येऊ द्या, त्यांना एकटा बास'अशा आशयाचा हा व्हिडीओ आहे. एकीकडे जिल्ह्यात सध्या रामदास कदम आणि भास्कर जाधव यांच्यातील संघर्षही चांगलाच पेटला आहे. या परिस्थितीत भास्कर जाधव यांचा ब्राह्मण समाजाशी सुरू असलेला वाद आणि जाधवांचे हे व्हॉट्सअॅप स्टेटस यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आलं आहे.