राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे ठाकरेबंधू एकत्र यावे यासाठी यापूर्वी अनेकांनी प्रयत्न केले आहेत. त्याबाबतच्या चर्चा नेहमी होत असतात. या विषयावर राज आणि उद्धव ठाकरे यांनी एकाच दिवशी सकारात्मक मत व्यक्त केलं. त्यामुळे पुन्हा एकदा ही चर्चा सुरु झाली आहे. राज ठाकरेंकडून तो प्रस्ताव आला तर आम्ही तो नाकारणार नाही, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यक्त केली होती. पण,या विषयावर मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी जुना इतिहास सांगत तुमच्यावर विश्वास कसा ठेवायचा? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांना विचारला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
आमची जीभ पोळलीय
संदीप देशपांडे यांनी या विषयावर मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी 2014 मधील विधानसभा निवडणूक आणि 2017 मधील महापालिका निवडणुकीचा इतिहास सांगितला. या दोन्ही निवडणुकीत मनसे आणि शिवसेना युतीचे प्रयत्न झाले. पण, ऐनवेळी शिवसेनेनं आमचे फोन घेणे बंद केले असं देशपांडे यांनी सांगितलं.
( नक्की वाचा : Sanjay Raut .... उद्धव ठाकरेंसोबत कालच चर्चा झाली ! 'ठाकरे' युतीवर संजय राऊत यांचा मोठा खुलासा )
दूध पिल्यानंतर जीभ पोळते त्यावेळी आपण ताकही फुंकून पितो ही मराठी म्हण देशपांडे यांनी सांगितली. आमची जीभ 2014 आणि 2017 मध्ये इतकी भाजली आहे. लोकांचीही भाजताना आम्ही बघितली आहे. तुमच्यावर विश्वास ठेवायचा तर तो कोणत्या मुद्यावर ठेवायचा? तुमच्यावर विश्वास ठेवावा अशी कोणती परिस्थिती निर्माण झाली आहे? हा महत्त्वाचा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पडतो, असं देशपांडे यावेळी म्हणाले. त्याचबरोबर युती करण्याचा अंतिम निर्णय राज ठाकरे घेतील असं त्यांनी स्पष्ट केलं.
तुम्ही चॉकलेट खातात ते बरोबर आहे?
तुम्ही आम्हाला वाईट ठरवून आमच्यासोबत एकत्र येऊ शकत नाही. आम्ही देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना जेवायला बोलावलं हे चुकीचं केलं. आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे चंद्रकांत पाटलांकडं जाऊन चॉकलेट खातात ते बरोबर आहे का? असा खोचक टोला देशपांडे यांनी लगावला.
( नक्की वाचा : Explained : उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांच्या आवाजाची गरज का? AI भाषणाचा 'मार्मिक' प्रभाव होईल? )
भाजपाची भूमिका 2019 च्या आधी माहिती नव्हती का? असा सवाल देशपांडे यांनी विचारला. भाजपाबरोबर युतीमध्ये 25 वर्ष सडलो, असं उद्धव ठाकरे 2017 साली भाषणात म्हणाले होते. त्याच भाजपासोबत त्यांनी 2019 मधील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत युती केली.
ज्या पक्षाबरोबर युती केली ती तोडून ते काँग्रेस आणि पवार साहेबांच्या नादी लागले. त्यांच्याबरोबर आघाडी केली. त्यानंतर ते मुख्यमंत्री झाले. माझा सरळ सोपा आणि 1 मार्काचा प्रश्न आहे. अडीच वर्ष उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद मिळालं असतं तर आज त्यांच्या लेखी भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र द्रोही असता का? याचं उत्तर उद्धव ठाकरे यांनी दिलं पाहिजे.
मुख्यमंत्रिपद देणार नाही तो महाराष्ट्र द्रोही
तुम्हाला मुख्यमंत्रिपद देणार नाही तो महाराष्ट्र द्रोही असा टोला देशपांडे यांनी लगावला. ज्या लोकांनी आम्हाला धोका दिला, भाजपाला धोका दिला आणि आता पवारसाहेब आणि काँग्रेसला धोका देण्याच्या तयारीत आहेत. या सर्वांना धोका देणाऱ्यांवर आम्ही कोणत्या मुद्यावर विश्वास ठेवायचा? असा प्रश्न देशपांडे यांनी विचारला.