राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात बँकांमध्ये मराठीचा वापर झालाच पाहीजे अशी भूमीका मांडली. त्यानंतर मनसैनिकांनी सर्व बँकांवर धडक दिली. त्यावेळी परप्रांतिय अधिकाऱ्यांना मनसैनिकांनी त्यांच्या स्टाईलमध्ये चोपही दिला. मराठी येत नाही यावरून अनेक ठिकाणी वाद ही झाला. हिंदी भाषीकांना होणाऱ्या मारहाणी विरोधात लोकजनशक्ती पार्टीचे खासदार राजेश वर्मा यांनी लोकसभेत आवाज उठवला होता. आता त्यांच्याच पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी वेगळी भूमीका मांडली आहे. त्यांना राज यांच्या भूमीकेचे एकीकडे समर्थन करताना दुसरीकडे मात्र त्यांना चिमटे काढण्याची संधी सोडली नाही. ते शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी आले होते.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
राज ठाकरे यांच्या मनसेने मराठीचा आग्रह धरला आहे. शिवाय नोकऱ्यांमध्ये मराठी माणसालाच प्राधान्य मिळालं पाहीजे ही त्यांची भूमीका आहे. यावर बिहारचे असलेले आणि केंद्रात मंत्री असलेल्या चिराग पासवान यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भारतात दुहेरी नागरीकत्व पद्धत नाही. प्रत्येक भारतीयाला देशातील कोणत्याही भागात जावून राहण्याचा काम करण्याचा अधिकार आहे. मात्र काही राज्यातील राजकीय पक्ष आपल्या राज्यातील लोकांना प्राथमिकता देण्याच्या विचारांचे आहे. असं पासवान म्हणाले.
पुढे ते म्हणाले की हे त्यांचे विचार अगदी बरोबर आहेत. असं म्हणत पासवान यांनी एक प्रकारे राज ठाकरे यांच्या विचारांचे समर्थन केलं. पण दुसरीकडे लगेचच, आपल्याला एका सर्वसमावेशक विचारधारेतून काम करण्याती गरज आहे. बिहारी लोकामध्ये काम करण्याची क्षमता आहे. उच्चपदस्था पासून मोलमजुरी पर्यंत सर्व कामं बिहारी माणसं करतात. त्यातून ते ज्या राज्यात काम करतात त्या राज्यातील अर्थव्यवस्थेत योगदान देतात. त्यामुळे आपल्या राज्यातील लोकांच्या प्राथमिकते बरोबरच सर्व समावेशक विचार केला, तर राज्य सुंदर होईल असा एक प्रकारे चिमटा ही चिराग पासवान यांनी राज ठाकरे यांचं नाव न घेता काढला.
ट्रेंडिंग बातमी - Income Tax विभागाचा अजब कारभार? मजूराला पाठवी 314 कोटींची नोटीस, पुढे काय झालं?
दरम्यान बिहारमध्ये पुढील सहा-सात महिन्यात निवडणुका होणार आहेत. आगमी निवडणूकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचाराचं सरकार आणि त्यांच्याच विचारांचा मुख्यमंत्री होईल असा ठाम विश्वास केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी व्यक्त केला आहे. मंत्रिपदाची माळ गळ्यात पडण्याआधी चिराग पासवान शिर्डीला साई दर्शनासाठी आले होते. त्यानंतर आता मंत्रीपद मिळाल्यानंतर प्रथमच सर्व परिवारासोबत त्यांनी साईबाबा समाधीचं दर्शन घेतलं. दरम्यान त्यांनी यावेळी कन्हैया कुमार याच्यावर ही जोरदार टिका केला. त्यांचे विचार देश तोडण्याचे आहेत. त्यामुळे त्यांच्या बरोबर बिहारी जनता जाणार नाही असंही ते म्हणाले.