Nanded Assembly : लेक की राजकीय शिष्य? अशोक चव्हाणांच्या बालेकिल्ल्यात कोणाचा 'जयजयकार' 

चव्हाण परिवारातील डॉ. शंकरराव चव्हाण,अशोक चव्हाण, सौ. अमिता अशोक चव्हाण यांनी नांदेड मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. आता श्रीजया अशोक चव्हाण इथून विधानसभेत आपले नशीब आजमावत आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
नांदेड:

नांदेड एक असा जिल्हा ज्या जिल्ह्याने देशाला गृहमंत्री दिला. राज्याला मुख्यमंत्री दिला. पण आता याच नांदेड जिल्ह्यात श्रीजया यांच्या जय किंवा पराजयामुळे एका माजी मुख्यमंत्र्यांचे भवितव्य ठरणार आहे. घराणेशाही लोकांना आवडते की नाही हेदेखील या निवडणुकीत ठरणार आहे. हे सगळं नांदेड जिल्ह्यातील भोकर हा विधानसभा मतदारसंघ ठरवणार आहे...

भोकर हा नांदेड जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघापैकी अत्यंत महत्त्वाचा मतदारसंघ. याच मतदारसंघाने राज्याला डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या रूपाने मुख्यमंत्री केंद्रीय गृहमंत्री या प्रमुख पदांसह अनेक मंत्रिपदे दिली. डॉ. शंकरराव चव्हाण यांच्यानंतर त्यांचे चिरंजीव अशोक चव्हाण यांच्याही रूपाने मुख्यमंत्री या पदासह अनेक मंत्रिपदे दिली. याच मतदारसंघाने मराठवाड्यात सर्वाधिक मते मिळवून निवडणून देण्याचा विक्रम रचला. चव्हाण परिवारातील डॉ. शंकरराव चव्हाण,अशोक चव्हाण, सौ. अमिता अशोक चव्हाण यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. आता श्रीजया अशोक चव्हाण इथून विधानसभेत आपले नशीब आजमावत आहे. त्यामुळे मतदारांना ही घराणेशाही आवडते की नाही हे देखील ठरणार आहे. 

श्रीजया अशोक चव्हाण यांच्या जय-पराजयावर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे नव्या पक्षातील राजकीय महत्त्व देखील ठरणार आहे. अर्धापूर मुदखेड आणि भोकर हे तीन तालुके मिळून भोकर हा विधानसभा मतदारसंघ तयार होतो. या मतदारसंघाला लागून तेलंगणा राज्याची सीमा देखील आहे. सुमारे तीन लाखांऐवढे मतदार या मतदारसंघात आहेत. आजवर डॉ. शंकरराव चव्हाण, अशोक चव्हाण, सौ अमिता अशोक चव्हाण हे काँग्रेस पक्षाकडून या मतदारसंघातून निवडून आले आहेत. आता मात्र चित्र वेगळे आहे. 

Advertisement

नक्की वाचा - एकमेकाचे जिवलग मित्र झाले कट्टर राजकीय वैरी, चाळीसगाव मतदारसंघाचा गड कोणता मित्र राखणार?

अशोक चव्हाण यांनी जन्मजात सदस्य असलेल्या काँग्रेसला सोडचिट्ठी दिली आहे. ते सध्या भाजपात आहेत. भाजपने त्यांना राज्यसभा सदस्य केले आहे. आता शंकरराव चव्हाण यांची तिसरी पिढी इथून नशीब आजमावत आहे. भाजपमध्ये अशोक चव्हाण यांनी प्रवेश केल्यावर नांदेडकरांना त्यांचा हा निर्णय रुचला नाही असं म्हटलं जात आहे. त्यातूनच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील जनतेने काँग्रेसला विजयी केले. त्यामुळे इथली जनता चव्हाणांना नाही तर काँग्रेसला मानणारी आहे, असे म्हणायला वाव मिळाला. 

काँग्रेस पक्षात अशोक चव्हाण म्हणतील तसं नांदेड जिल्ह्यासाठी निर्णय व्हायचे. भाजपमध्ये मात्र तसं नाही. आता विधानसभेसाठी काँग्रेस पक्षाने या मतदारसंघात अशोक चव्हाणांच्या मुशीत तयार झालेल्या तिरुपती कोंढेकर यांना उमेदवारी दिली आहे. येथे विशेष म्हणजे चव्हाणांच्या शिष्यानेच आव्हान दिलं आहे. अशोक चव्हाण हे जिल्ह्याच्या राजकीय डावपेचातील मॅनेजमेंट गुरू म्हणून ओळखले जातात. पण त्यांचे राजकीय व्यवस्थापन तिरुपती कोंढेकर यांना व्यवस्थित माहित आहे. कारण चव्हाण हे कोंढेकर यांचे गुरू. असं म्हणतात की, गुरु त्यांच्या शिष्याला एक डाव सोडून सगळे डाव शिकवतो. अशोक चव्हाणांनी देखील कोंढेकरांसोबत असंच केलं असेल काय, हे येत्या काळात ठरवणार आहे. 

Advertisement

कोंढेकर यांनी मराठा आरक्षण आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवला होता. या मतदारसंघात मराठा मतदारांच्या तीनपट ओबीसी मतदार आहे. त्यामुळे कोंढेकर हे ओबीसींचा विश्वास कसा जिंकतील हा मुख्य प्रश्न आहे. अशोक चव्हाण यांना प्रत्येक गावातील मतदार, सरपंच, प्रभावी पुढारी यांची थेट ओळख आहे. त्याचा याही निवडणुकीत कितपत फायदा होईल का हा प्रश्न आहे. स्वतःच्याच शिष्याला न शिकवलेला एक डाव अशोक चव्हाण यांनी खेळाला तर त्याचं शिष्य कसं प्रत्युत्तर देईल, याबाबत सर्वांमध्ये उत्सुकता आहे.

भाजपमध्ये दाखल झालेल्या चव्हाण याना साम दाम दंड भेद या नीतीचा अबलंब करून श्रीजयला जय मिळवून देणे अत्यावश्यक आहे. श्रीजया विजयी झाल्या तर चव्हाणांची तिसरी पिढी राजकारणात यशस्वी होईल. घराणेशाहीचा आरोप दूर होईल, मतदारसंघ काँग्रेसचा नाही तर चव्हाणांचा आहे हे सिद्ध होईल... तसेच भाजपमध्ये चव्हाणांचे वजन वाढून जम बसण्यास मदत होणार आहे. निवडणूक एक पण त्याच्या निकालावरून अनेक प्रश्नाची उत्तरे मिळणार आहेत. म्हणूनच श्रीजया यांच्या जय पराजयाला खूप महत्त्व आहे.

Advertisement