नारायण राणेंचा शिवसेनेच्या मतदार संघावर डोळा, मुख्यमंत्र्यांसोबत बंद दाराआड चर्चा काय?

लोकसभेला एकनाथ शिंदे यांनी हक्काचा मतदार संघ राणेंना दिला होता. त्यामुळे आता विधानसभेला ही ते राणेंसाठी मतदार संघ सोडणार का? हा खरा प्रश्न आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
मुंबई:

खासदार नारायण राणे हे आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. लोकसभेला शिवसेना शिंदे गटाच्या ताब्यात असलेला रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघ राणे आपल्या पदरात पाडून घ्यायला यशस्वी ठरले होते. शिवाय त्यांनी विजयही मिळवला होता. आता शिवसेना शिंदे गटाच्या ताब्यात असलेला आणखी एक मतदार संघावर राणे यांचा डोळा आहे. हा मतदार संघ आपल्याला मिळावा यासाठी राणे यांनी आतापासूनच फिल्डींग लावली आहे. त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. या दोन्ही नेत्यांची या मतदार संघाबाबत बंद दाराआड चर्चा झाली. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा)

नारायण राणे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ- मालवण या विधानसभा मतदार संघासाठी आग्रही आहेत. या मतदार संघात शिवसेनेचे वैभव नाईक हे विद्यमान आमदार आहेत. शिवसेनेत फुट पडल्यानंतर वैभव नाईक यांनी ठाकरेंची साथ दिली. त्यामुळे या मतदार संघावर महायुतीत शिवसेना शिंदे गटाचा दावा आहे. मात्र हा मतदार संघ भाजपला सुटावा असे राणे यांचे प्रयत्न आहेत. या मतदार संघातून राणेंचे पुत्र निलेश राणे हे निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. त्यांनी या मतदार संघात तयारीही सुरू केली आहे. शिवाय निवडणूक लढणार याचे संकेतही त्यांनी दिले आहेत. 

ट्रेंडिंग बातमी - मविआच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला NDTV मराठीच्या हाती, कोणाच्या वाट्याला किती जागा?

कु़डाळ मालवण हा मतदार संघ शिवसेनेचा गड समजला जातो. नारायण राणे यांनी याच मतदार संघातून अनेक वेळा विजय मिळवला होता. शिवसेना सोडल्यानंतरही राणे यांनी काँग्रेसच्या तिकीटावर या मतदार संघातून विजय मिळवला.  मात्र 2014 च्या निवडणुकीत राणे यांचा पराभव झाला. शिवसेनेच्या वैभव नाईक यांनी त्यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. त्यानंतर राणे कुटुंबातील कोणीही या मतदार संघातून निडणूक लढवली नाही. वैभव नाईक यांनी  2014 आणि 2019 अशी सलग दोन वेळा इथून विजय मिळवला.    

ट्रेंडिंग बातमी - '50 जणांना पाडणार' यादी तयार, टोपे, पवार,पाटील यांच्यासह यादीत कोणा कोणाची नावं?

शिवसेनेत फुट पडल्यानंतर आमदार वैभव नाईक हे ठाकरें बरोबर राहील. सध्याच्या स्थिती या मतदार संघावर शिंदे यांचा दावा आहे. त्यामुळे तो दावा सोडावा अशी मागणी राणे यांची आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात विधानसभेचे तीन मतदार संघ आहेत. त्यातील सावंतवाडीमध्ये शिंदे गटाचे दीपक केसरकर हे आमदार आणि मंत्री आहेत. देवगड कणकवलीमध्ये नितेश राणे हे आमदार आहेत. तर कुडाळ मालवण हा शिवसेनेच्या कोट्यातील मतदार संघ आहे. तिथे निलेश राणे जोरदार तयारी करत आहेत. शिवाय निवडणूक लढण्याचे संकेतही त्यांनी दिले आहे. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - मुख्यमंत्र्यांचे सचिव महायुतीत मिठाचा खडा टाकणार ? चक्रव्यूह भेदण्यासाठी दुसरा 'अभिमन्यू' तयार

लोकसभेला एकनाथ शिंदे यांनी हक्काचा मतदार संघ राणेंना दिला होता. त्यामुळे आता विधानसभेला ही ते राणेंसाठी मतदार संघ सोडणार का? हा खरा प्रश्न आहे. निलेश राणेंच्या ताकदीचा उमेदवारही सध्या शिंदेंकडे नाही ही वस्तूस्थिती आहे. त्यामुळे एक तर मतदार संघ सोडण्याचा पर्याय शिंदें समोर आहे. किंवा निलेश राणे यांना शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढण्याचा दुसरा पर्याय शिंदे समोर असेल. त्यामुळे या पैकी कोणता पर्याय आता शिंदे राणेंना देतात हे पाहावे लागेल.